अलिबाग : अरुंद रस्ते, वाहनांची वर्दळ आणि त्यामुळे निर्माण होणारी वाहतूककोंडी हे अलिबागमधील नित्याचे चित्र आता बदलणार आहे. अलिबाग नगरपालिका सुमारे दोन कोटी ७० लाख रुपये खर्च करून अलिबागमधील तीन रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणार आहे. त्यापैकी दोन रस्त्यांच्या रुंदीकरणामुळे शहरातील रस्त्यांचा कायापालट होणार आहे. अलिबाग नगरपालिकेला नगरोत्थानमार्फत २ कोटी ७० लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. शहरातील रस्ते अरुंद असल्याने तेथे वाहतूककोंडी नियमित होते. अलिबाग हे पर्यटनदृष्ट्या विकसित होत असल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचप्रमाणे अलिबागसह नगरपालिकेच्या हद्दीला लागून असलेल्या चेंढरे, वरसोली आणि कुरूळ ग्रामपंचायतीमध्ये नागरीकरण वाढत आहे. अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने सर्व ताण हा शहरावर पडत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी अलिबाग नगरपालिका बालाजी नाका ते मारुती नाका (मारुती मंदिर) आणि आसरा हॉटेल ते नवीन पोस्ट आॅफीस या रस्त्याचे रुंदीकरण करणार आहे. त्यामुळे या मार्गावरील दोन्हीकडील अस्तित्वात असणारी बांधकामे अलिबाग नगरपालिकेकडून पाडण्यात येणार आहेत. यामध्ये काही घरे आणि दुकानांचा समावेश आहे. या कामांना बुधवारपासून सुरुवात होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी दिली.बांधकामे पाडल्यानंतर या ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. नवीन पोस्ट आॅफीसपासून थेट अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण झालेले आहे. जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या इमारतीची कम्पाउंड वॉल आधीच पाडून रस्ता रुंद करण्यात आला आहे. त्यामुळे बालाजी नाका ते थेट अलिबागचा समुद्रकिनारा हा रस्ता रुंद होणार आहे. (प्रतिनिधी)
रस्ता रुंदीकरणाला सुरुवात
By admin | Updated: February 24, 2016 03:03 IST