महाड : गणेशोत्सव एक दिवसावर येवून ठेवला असतानाच महाडच्या बाजारपेठेत उत्सवाच्या सामानांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी नव्हती त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते मात्र आज पावसाने उघडीप दिल्याने तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांसह शहराच्या ठिकाणाहून आलेल्या चाकरमान्यांनी खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून आले. संपूर्ण बाजारपेठ मंगळवारी ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेली होती.आरास सजावटीची सामान, कपडे, मिठाई, पूजेचे साहित्य आदी साहित्यांची खरेदी करण्यासाठी शहरातील सर्वच दुकानांमध्ये गर्दी झाल्याचे दिसून आले. शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची देखील तयारीची लगबग सुरु असून विविध चलचित्रांचे, देखावे व सजावटीच्या कामांमध्ये मंडळांचे कार्यकर्ते रात्रंदिवस कार्यरत आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतर्फे मुख्य रस्त्यावर आकर्षक स्वागत कमानीची जणू स्पर्धाच असल्याचे दिसून येत आहे. सर्वत्र दिसून येणाऱ्या स्वागत कमांनीनी सार्वजनिक मंडळांचे मंडप यामुळे महाड शहरातील वातावरण उल्हासित झाले आहे. (वार्ताहर)चायनीज लाइटिंग : गौरी-गणपती, नवरात्रोत्सव सणांचे मुहूर्तावर बाजारात विविध सजावटीच्या वस्तू दाखल झाल्या आहेत. आता चायनीज लाइटिंगचे विविध प्रकार ग्राहकांना मोहून टाकतात. युज अँड थ्रोचा फंडा आता वापरला जातो. सजावटीसाठी फ ोकस लाइट, इलेक्ट्रीक वायरिंग आवर्जून वापरली जाते. चायनीज लाइटिंगला चांगला प्रतिसाद बाजारात मिळत आहे. पन्नास रुपयांपासून पाच हजारांपर्यंतचा सेट उपलब्ध आहे.पूजेच्या साहित्याला मागणी : गणरायाच्या स्वागतासाठी सारे सज्ज झाले असून बाजारात पूजा साहित्याची मागणी वाढली असून खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. सात रुपयांपासून १५० रुपयापर्यंत विविध आकारात कापूरडब्या व पाकिटे उपलब्ध आहेत. उदबत्ती तर पाच रुपये ते २०० रुपये किमतीत चौकोनी, गोल, मोठ्या उदबत्ती बाजारात आहेत. गणरायाच्या कंठहाराची किंमत २० रुपयांपासून ते ७० रुपयांपर्यंत आहे.
महाड बाजारपेठेत खरेदीसाठी झुंबड
By admin | Updated: September 15, 2015 23:24 IST