नागोठणे : विभागातील ऐनघर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निवडून आलेले सदस्य सचिन भोसले यांनी दिलेला जातीचा दाखला चुकीचा असल्याचा ठपका ठेवत तो रद्दबातल आणि सरकारजमा करण्याचा आदेश मुंबई विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती क्र . एकच्या संशोधन अधिकारी एस. आर. तडवी यांनी दिला आहे. याच महिन्यात पुन्हा एकदा या ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक होत असून निवडणुकीच्या तोंडावरच हा निकाल जाहीर झाला असल्याने संभाव्य उमेदवार या निकालाचा धडा घेतील अशी चर्चा नागोठणे विभागात रंगू लागली आहे. ऐनघर ग्रामपंचायतीच्या आॅक्टोबर २०१० मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सचिन भोसले हे बाळसई येथून नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी असणाऱ्या जागेतून निवडून गेले होते. त्यावेळी त्यांनी त्यांचा जातीचा दाखला उपविभागीय अधिकारी, माणगाव यांच्याकडे दाखल केल्यानंतर जिल्हाधिकारी, रायगड यांचेमार्फत पडताळणी समितीकडे पाठविण्यात आल्यावर कालांतराने तो तत्कालीन समितीने वैध ठरविला होता. या दाखल्याबाबत बाळसई येथील परशुराम तेलंगे यांना संशयास्पद वाटल्याने त्यांनी आक्षेप घेत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सुनावणीनंतर उच्च न्यायालयाकडून संबंधित समितीने त्याची फेरतपासणी करावी असा आदेश २०१४ मध्ये दिला होता.
सचिन भोसले यांचे जातीचे प्रमाणपत्र अवैध
By admin | Updated: October 5, 2015 00:28 IST