दासगाव : सध्या महाड तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मुंबई - गोवा महामार्गालगत असणारा केंबुर्ली या गावात अशाच प्रकारे पाणी टंचाईची झळ बसली आहे. जनता पाण्याकरिता वणवण करीत आहे. अशा परिस्थितीत याच गावातील किफायत कासीम घोले हा गावासाठी आदर्श बनला असून स्वखर्चाने एका टेम्पोवर हजार लिटरची टाकी बसवून दिवसरात्र गावातील प्रत्येक वाडीवर गेली पंधरा दिवसापासून स्वत: उभे राहून मोफत पाणी वाटप करत आहे.वडील कासीम अब्दला घोले बांधकाम व्यवसायिक आणि किफायत कासीम घोले याने बी.कॉम शिक्षण घेतल्यानंतर तालुक्यातील टोळ या गावी किराणा मालाचे दुकान चालवतो. गावात भिषण पाणी टंचाई आहे, आपल्याला लोकांच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी काहीतरी करायचे आहे या दृष्टीकान मनामध्ये बाळगत त्याने एक छोटासा टेंपो विकत घेतला. त्यामध्ये हजार लिटरची टाकी बसवली. यासाठी त्याने आपल्या खिशातून जवळपास साडेतीन लाख रुपये खर्च केले. गेली पंधरा दिवस केंबुर्ली गावात संपूर्ण वाडीवाडीवर तो स्वत: उभे राहून या टेम्पोच्या सहाय्याने पाणी वाटप पुण्याईचे काम करत आहे. केंबुर्ली पासून १५ किमी अंतरावर असलेल्या दाभोळहून तो दरदिवस पाच ते सहा पाण्याच्या फेऱ्या मारतो. गाडीला लागणारे डिझेल तसेच पाणी भरण्याकरिता तसेच वाटपासाठी लागणारा कामगारांचा खर्च स्वत: करतो. दरदिवशी त्याला या पाण्यासाठी जवळपास हजार रुपये खर्च असून अहोरात्र गावाच्या सेवेसाठी तो झटत आहे.
केंबुर्लीकरांची तहान भागवण्याचा संकल्प
By admin | Updated: May 22, 2016 02:12 IST