Rainwater seeped into houses in Kalamboli area | कळंबोली परिसरात घरांमध्ये शिरले पावसाचे पाणी

कळंबोली परिसरात घरांमध्ये शिरले पावसाचे पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेल परिसराला मंगळवारी रात्री सुरू झालेल्या मुसळधार पावसाने झोडपले. बुधवारी तब्बल ३०६ मिमी अशा रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद करण्यात आली. पावसामुळे कळंबोली, खांदा कॉलनी, पनवेल शहर, उलवे नोडच्या काही भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.


कळंबोली शहरातील सखल भागात, तसेच लोकांच्या घरातही पाणी शिरले होते. पावसाचा जोर सकाळी ७च्या सुमारास कमी झाल्याने, अनेक ठिकाणी साचलेले पाणी आपोआपच ओसरल्याचे पाहावयास मिळाले. सिडको, पालिका प्रशासनाला फोन करत, नागरिक केवळ मदत मागत राहिले. मात्र, लोकांना या प्रशासनाच्या मार्फत मदत झाली नसल्याचे कळंबोली केएल ५ येथील रहिवासी परेश पाटील यांनी सांगितले. विशेष म्हणजे, शहरातील पंप हाउस बंद असल्याने शहरात त्वरित पाणी साचून नागरिकांच्या घरात पाणी भरण्यास सुरुवात झाली. समाजसेवक आत्माराम कदम यांनी सकाळी ६.३०च्या सुमारास पंप हाउस गाठत त्या ठिकाणी झोपलेल्या कर्मचाऱ्यांना जागे केल्यावर पंप हाउस सुरू झाल्यावर साचलेले पाणी ओसरण्यास सुरुवात झाली.खारघरमधील स्वप्नपूर्ती या सिडकोच्या गृहप्रकल्पातही पाणी शिरले होते .सायन पनवेल महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती.

२६ जुलैच्या घटनेची पुनरावृत्ती टळली : २६ जुलै, २००५ साली पूर्ण कळंबोली पाण्यात गेली होती. मुसळधार पावसामुळे तब्बल दोन मजल्यापर्यंत पाणी पोहोचले होते. या घटनेनंतर तब्बल १५ वर्षांनी कळंबोलीतील घरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली होती. रात्रभर मुसळधार बरसलेल्या पावसाने पहाटे ब्रेक घेतल्याने २००५ची पुनरावृत्ती टळली, अन्यथा कळंबोली शहरात पुन्हा एकदा हाहाकार माजला असता.

या ठिकाणी साचले होते पाणी : कळंबोली केएल १, केएल २, केएल ४, केएल ५ आणि बी टाईप, पनवेल शहर, खांदा कॉलनी, नवीन पनवेलमध्ये सखल भागात पाणी साचले होते. सायन पनवेल महामार्गावर कळंबोली, ओरियनजवळील मार्ग पूर्णपणे पाण्यात गेला होता.

Web Title: Rainwater seeped into houses in Kalamboli area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.