Raigad: काळिंजेच्या खाडीत दुर्मीळ समुद्री घोड्याचे दर्शन, जैविक महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित

By निखिल म्हात्रे | Published: April 25, 2024 01:13 PM2024-04-25T13:13:51+5:302024-04-25T13:14:33+5:30

Raigad News: रायगड जिल्ह्यातील काळिंजेच्या खाडीत दुर्मीळ समुद्री घोड्याचे दर्शन झाले आहे. मच्छीमारांना मासेमारी करताना हा जीव जाळ्यात सापडला होता. त्यांनी त्याला पुन्हा खाडीत सोडले. यानिमित्ताने काळिंजेच्या खाडीचे जैविक महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

Raigad: Sighting of rare seahorse in Kalinje Bay, biological importance highlighted once again | Raigad: काळिंजेच्या खाडीत दुर्मीळ समुद्री घोड्याचे दर्शन, जैविक महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित

Raigad: काळिंजेच्या खाडीत दुर्मीळ समुद्री घोड्याचे दर्शन, जैविक महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित

- निखिल म्हात्रे
अलिबाग - रायगड जिल्ह्यातील काळिंजेच्या खाडीत दुर्मीळ समुद्री घोड्याचे दर्शन झाले आहे. मच्छीमारांना मासेमारी करताना हा जीव जाळ्यात सापडला होता. त्यांनी त्याला पुन्हा खाडीत सोडले. यानिमित्ताने काळिंजेच्या खाडीचे जैविक महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

श्रीवर्धन तालुक्यापासून १३ किमी अंतरावरील काळिंजे गावामध्ये १९० हेक्टर क्षेत्रावर कांदळवन पसरले आहे. याठिकाणी खाडीच्या मध्यभागी असलेल्या बेटाभोवती कांदळवनांचे दाट आच्छादन आहे. या बेटावरच वालुकामय चिखलाच्या मैदानाचा एक मोठा भाग पसरलेला आहे. काळिंजे गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय म्हणजे मासेमारी. मंगळवारी (दि. २३) सकाळी १० वाजता काळिंजे येथील मच्छीमार अनिस फणसोपकर खाडीत मासेमारी करत असताना त्यांना जाळ्यात समुद्री घोडा आढळला.

खाडीत कोळंबी पकडण्यासाठी पाग टाकलेला असताना, त्या जाळ्यात नारंगी रंगाचा समुद्री घोडा आढळल्याची माहिती फणसोपकर यांनी दिली. त्यांनी लागलीच या समुद्री घोड्याला जाळ्याबाहेर काढले आणि याची माहिती कांदळवन प्रतिष्ठानाचे सहायक संशोधक मोहन उपाध्ये यांना दिली. त्यांनी या समुद्री घोड्याची पाहणी करून फणसोपकर आणि विक्रांत गोगरकर यांच्या मदतीने पुन्हा त्याला खाडीत सोडले. या समुद्री घोड्याची लांबी १३ सेमी होती. समुद्री घोडा हा भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षित असून, त्याला वाघाएवढे संरक्षण देण्यात आले आहे.

खाडीत कांदळवनांवर आधारित निसर्ग पर्यटन
काळिंजे खाडीत कांदळवनांवर आधारित निसर्ग पर्यटन सुरू आहे. गावातील स्थानिक लोक कांदळवन कक्षाच्या मदतीने निसर्ग पर्यटन करत आहेत. या खाडीत कांदळवनांच्या ११ प्रजाती आढळत असून, पक्ष्यांच्या सुमारे ८० हून अधिक प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. तसेच पाणमांजरांचा अधिवास या परिसरात पाहावयास मिळतो. महत्त्वाचे म्हणजे चारही बाजूंनी खाऱ्या पाण्याने वेढलेल्या बेटाच्या मध्यभागी गोड्या पाण्याच्या विहिरी असून, तिथे कोल्हे व रानडुकरांचे अस्तित्व आहे. त्यामुळे येथील जैवविविधता लक्षात घेऊनच निसर्ग पर्यटनाला सुरुवात केली आहे.

Web Title: Raigad: Sighting of rare seahorse in Kalinje Bay, biological importance highlighted once again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड