In Raigad district, proper arrangement | रायगड जिल्ह्यात चोख बंदोबस्त
रायगड जिल्ह्यात चोख बंदोबस्त

अलिबाग : अयोध्येमधील जमीन ही रामलल्लाचीच असल्याचा ऐतिहासिक निकाल सर्वाेच्च न्यायालयाने शनिवारी दिला. निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. निकाल जाहीर झाल्यावर सर्वधर्मीयांनी समाधान व्यक्त केले.
अलिबाग, पेण आणि महाडमधील राम मंदिरामध्ये घंटा नाद आणि महाआरतीचा कार्यक्रम हिंदुत्ववादी संघटनांनी साजरा करणार होते. मात्र, कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव त्यांना परवानगी देण्यात आली नाही. कायद्याची बंधणे असल्याने कोणाच्याही भावना दुखवणार नाहीत याचे भान ठेवणे आवश्यक आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असल्याचे या वेळी भाजपचे नेते अ‍ॅड. महेश मोहिते यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
निकालाच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील असणाऱ्या ठिकाणी पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते. त्याचप्रमाणे समाजमाध्यमातून काही आक्षेपार्ह आणि समाजामध्ये तेढ निर्माण होईल, अशा पोस्टवरही पोलिसांनी सायबर सेलच्या माध्यमातून आपली नजर ठेवली होती.
जिल्ह्यात ११४ पोलीस अधिकारी, एसआरपीएफच्या दोन तुकड्या, ३५० मुख्यालय कर्मचारी, एक हजार ६०० स्थानिक पोलीस ठाण्याचे कर्मचारी, ५११ होमगार्ड, दोन दंगल नियंत्रक पथके, असा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन आधीच केले होते. जिल्ह्यात सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा पोलिसांनी ही पावले उचलली होती. सायंकाळपर्यंत जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
>अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
म्हसळा : अयोध्येतील जमीनमालकीच्या वादावरील निकाल शनिवारी लागला. नागरिकांनी निकालानंतर कोणत्याही अफवांना बळी पडू नये, अफवा पसरवू नये, कोणतीही शंका आली तरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन म्हसळेचे पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांनी केले.
निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहविभाग, जिल्ह्यांत व प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत शांततेचे आवाहन केले आहे, त्याच अनुषंगाने श्रीवर्धनचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसळा शहरात रूटमार्च काढण्यात आला. यामध्ये श्रीवर्धन पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, दिघी सागरीचे स.पो.नि. महेंद्र शेलार, पोलीस उपनिरीक्षक शेख, एस.आर.पी. स्ट्राइकिंग फोर्स, आर.सी.पी. स्थानिक व श्रीवर्धन आणि दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी सहभागी होते.
>पनवेलमध्ये फौजफाटा तैनात
पनवेल : अयोध्या निकाल प्रकरणी पनवेल परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निकालानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याकरिता परिमंडळ-२ च्या माध्यमातून शहरातील महत्त्वाच्या मशीद, रेल्वे स्टेशन, चौक आदी ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा ठेवण्यात आला होता.
दिवसभर कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. सर्वत्र शांततेचे वातावरण होते. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने धार्मिक सलोखा कायम राहावा याकरिता डॉक्युमेंट्री तयार करण्यात आली होती.
सर्वधर्मीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या डॉक्युमेंट्रीत शांतता राखण्याचे आवाहन केले होते. पोलिसांमार्फत सोशल मीडियावरही निकालाच्या अनुषंगाने कोणीही अफवा पसरवू नये, असे आवाहन करण्यात आले होते.
>अयोध्येमधील विवादीत जमीन ही रामलल्लाची असल्याबाबत सर्वाेच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. या निर्णयाने खरोखरच आनंद होत आहे. सर्व समावेशक निर्णय दिल्याने तो सर्वांनाच मान्य आहे. त्याबद्दल न्यायदेवतेचे प्रथम आभार मानतो.
- भरत गोगावले, आमदार
>शेकडो वर्षे प्रलंबित प्रश्नावर सर्वाेच्च न्यायालयाने निकाल देत वादावर पडदा टाकला आहे. भावनिक आणि धार्मिक चौकटीत न अडकता फक्त कायद्याच्या कसोटीवर सर्वाेच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे, त्याचे स्वागत आहे. आता या प्रश्नाचे कोणीही भांडवल करू नये.
- उल्का महाजन,
सामाजिक कार्यकर्त्या

Web Title: In Raigad district, proper arrangement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.