पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक ठेवीदारांचा आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 11:34 PM2019-09-24T23:34:03+5:302019-09-24T23:34:14+5:30

खोपोलीत अनेकांना बसला धक्का; बॅकेवर आरबीआयचे निर्बंध

Punjab Maharashtra Co-operative Bank depositors complain | पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक ठेवीदारांचा आक्रोश

पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक ठेवीदारांचा आक्रोश

Next

खोपोली : पेण अर्बन बँक बुडालेल्या घटनेला २३ सप्टेंबर रोजी ९ वर्षे पूर्ण होत असतानाच आणि खोपोलीकर त्या धक्क्यातून थोडेफार सावरत होते, तोच सोमवारी सायंकाळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादल्यामुळे हजारो ठेवीदारांना जबरदस्त धक्का बसला. मंगळवारी सकाळपासून बँकेच्या खोपोली शाखेबाहेर ठेवीदारांचा आक्रोश सुरू होता.

निर्बंध लादल्यामुळे बँकेला नवी कर्ज देणे, ठेवी स्वीकारण्यासह अनेक गोष्टींवर निर्बंध असतील, तर खातेदार केवळ एक हजार रुपये इतकीच रक्कम काढू शकतील. बँकेची सद्यस्थिती पाहता नागरिकांच्या हितासाठी बँकेवर निर्बंध आणणे गरजेचे होते, असे रिझर्व्ह बँकेच्या आदेशात म्हटले आहे. या आर्थिक निर्बंधाच्या आदेशानुसार २३ सप्टेंबरपासून बँकेने रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेशिवाय कोणतेही नवे कर्ज देऊ नये, जुन्या कर्जांचे नूतनीकरण करू नये, बँकेने कोणतीही गुंतवणूक करू नये, तसेच नव्या ठेवी स्वीकारू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर, बँकेची देणी फेडण्यासाठी देयक अदा करू नये, असे या आदेशात म्हटले आहे.

निर्बंधाच्या काळात बँकेच्या ठेवीदारांना आपल्या सर्व प्रकारच्या खात्यांमधून केवळ एक हजार रुपयेच काढता येतील. मात्र, हा ठेवीदार बँकेचा कोणत्याही प्रकारचा देणेकरी असल्यास किंवा कर्जाचा हमीदार असल्यास ही रक्कम कर्ज खात्यात जमा होईल. ठेवीदारांच्या ठेवीची मुदत संपत असल्यास ही ठेव त्याच व्यक्तीच्या नावाने व त्याच व्याजदराने पुन्हा गुंतवता येईल. या काळात बँकेला कर्मचाऱ्यांचे पगार, जागेचे भाडे, कर, वीजबिल, प्रिंटिंग व स्टेशनरी, पत्रव्यवहार कायदेशीर खर्च यासाठी खर्च करता येईल. मात्र, वकिलांना प्रत्येक खटल्यामध्ये पाच हजारांपेक्षा अधिक रक्कम देता येणार नाही. ठेवीदारांच्या संरक्षणासाठी असलेल्या विमा योजनेसाठी याशिवाय इतर काही आवश्यक खर्च करण्यासाठी बँकेला परवानगी देण्यात आली आहे.

कर्ज फेडण्यासाठी कर्जदार त्यांच्या ठेवींचा वापर करू शकतात. मात्र, अशा खात्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण असणे आवश्यक आहे. हे निर्बंध सहा महिन्यांसाठी लागू असतील व त्याचा पुन्हा आढावा घेतला जाईल. या निर्बंधाची माहिती बँकेने प्रत्येक ठेवीदाराला देणे बंधनकारक आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेचे कार्यकारी संचालक डॉ. रबी मिश्रा यांनी दिली.

Web Title: Punjab Maharashtra Co-operative Bank depositors complain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.