अलिबाग : आशिया खंडात खतनिर्मितीमध्ये अग्रेसर असणाऱ्या थळ-अलिबाग येथील प्रकल्पाचा खासगीकरण करण्याचा घाट भाजप सरकारने घातला आहे. खासगीकरणाच्या नावाखाली हाच प्रकल्प अंबानीसारख्या भांडवलदाराच्या घशात घालण्याची तयारी मोदी सरकारने सुरू केल्याचा गौप्यस्फोट शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केला. भांडवलधार्जिण्या भाजप सरकारला सत्तेतून खाली खेचा आणि आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणा, असे आवाहनही त्यांनी केले.अलिबाग विधानसभा मतदारसंघात सोमवारी आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी रामराज, नागाव, अलिबाग-खडताळपूल, धोकवडे, फोपेरी, वेश्वी आणि कुसुंबळे येथे विविध प्रचार सभांचा कार्यक्रम होता. वेश्वी येथील सभेत आमदार पाटील बोलत होते.भाजपचे मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आले तर देशाचे संविधान बदलून देशाचे तुकडे पाडले जातील. त्यामुळे मोदी सरकारला सत्तेपासून रोखले पाहिजे. यासाठीच आघाडीच्या उमेदवारांना निवडून दिले पाहिजे, असे आवाहनही पाटील यांनी केले.आरसीएफच्या प्रकल्पाचे खासगीकरण करून तो प्रकल्प अंबानींच्या घशात घालण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळेच थळ प्रकल्पाचे टप्पा तीनमधील विस्तारीकरण भाजप सरकारने जाणूनबुजून रखडवले आहे. त्यामुळे १४१ प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न बिकट झाल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाला अतिशय मजबूत असे संविधान दिले आहे. संविधानामुळे सर्व जातींना अधिकार मिळाले आहेत. तेच संविधान बदलून बहुजन समाजाचा शिक्षणाचा हक्क काढण्यासाठी अनुदानित शाळा बंद करण्याची तयारी भाजप सरकारने केली आहे असेही पाटील यांनी स्पष्ट करून तटकरे यांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करण्याचे आवाहन केले.
'भांडवलधार्जिण्या भाजपा सरकारला सत्तेतून खाली खेचा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 00:22 IST