नेरळमधील व्यापारी संकुलाच्या कामाला गती

By Admin | Updated: November 16, 2016 04:41 IST2016-11-16T04:41:03+5:302016-11-16T04:41:03+5:30

रायगड जिल्हा परिषद बांधत असलेले पहिले व्यापारी संकुल नेरळमध्ये साकारत आहेत. नेरळ विकास प्राधिकरणच्या साडेचार कोटींच्या

Progress in the business model of Nerall | नेरळमधील व्यापारी संकुलाच्या कामाला गती

नेरळमधील व्यापारी संकुलाच्या कामाला गती

कर्जत : रायगड जिल्हा परिषद बांधत असलेले पहिले व्यापारी संकुल नेरळमध्ये साकारत आहेत. नेरळ विकास प्राधिकरणच्या साडेचार कोटींच्या निधीमधून हे व्यापारी संकुल उभे राहत असून चार मजली व्यापारी संकुलात शंभरहून अधिक गाळे आहेत. राज्यातील पहिला प्रयत्न रायगड जिल्हा परिषद करीत असून २०१७च्या सुरुवातीला या संकुलाचे लोकार्पण होईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी दिली.
माथेरान या जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळाला जाण्याचे प्रवेशद्वार म्हणून नेरळची ओळख आहे. नेरळमधील आर्थिक घडीदेखील ५० टक्के माथेरानच्या पर्यटनावर अवलंबून आहे. त्या नेरळ गावातील दाटीवाटीचे रस्ते ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. नेरळमधील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहाच्या जागेवर विकासाच्या दृष्टीने नेरळ विकास प्राधिकरणच्या माध्यमातून बहुमजली व्यापारी संकुल बांधण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात बहुमजली स्वरूपाचे कुठेही व्यापारी संकुल नाही. जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी चार मजली व्यापारी संकुल बांधण्यासाठी साडेचार कोटींचा निधी मंजूर करून घेतला. तेथे शंभरहून अधिक गाळे बनवून एका ठिकाणी एक मोठे मार्केट वसवण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी होत आहे. या व्यापारी संकुलाचा फायदा नेरळच्या बाजारपेठेतील वाहतूककोंडी कमी होण्यासाठी होऊ शकतो. तर अनेक गरजवंतांना व्यवसाय मिळू शकतो.
जून महिन्यात भूमिपूजन करण्यात आलेल्या नेरळ व्यापारी संकुलाचे बांधकाम तेथे मोठ्या प्रमाणात असलेल्या पावसाच्या पाण्यामुळे सुरू होऊ शकले नाही. मात्र, पावसाचा जोर कमी होताच नेरळ व्यापारी संकुलाचे काम सुरू झाले आहे. तळमजल्यावर पार्किंग आणि दोन मजल्यांवर व्यापारी गाळे, तर तिसऱ्या मजल्यावर जिल्हा परिषदेचे विश्रामगृह अशी रचना असलेल्या या संकुलाच्या कामाने गती घेतली आहे. व्यापारी संकुलात लोकांना चढ-उतार करण्यासाठी लिफ्टदेखील बसवली जाणार असून राज्यात जिल्हा परिषदेने उभारलेले चार मजली पहिल्या व्यापारी संकुलाचे काम आता जोरात सुरू आहे. लवकरात लवकर व्यापारी संकुलाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या असल्याची माहिती नेरळ प्राधिकरणचे विशेष उपअभियंता सदानंद शिर्के यांनी दिली. (वार्ताहर)

Web Title: Progress in the business model of Nerall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.