जलवाहिनी फुटल्याने पनवेलकर त्रस्त; कंपनीवर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 11:27 PM2020-02-02T23:27:52+5:302020-02-02T23:28:36+5:30

खांदा वसाहतीत महानगर गॅसवाहिनीचे काम सुरू

Panvelkar troubled by disintegration; Demand action against the company | जलवाहिनी फुटल्याने पनवेलकर त्रस्त; कंपनीवर कारवाईची मागणी

जलवाहिनी फुटल्याने पनवेलकर त्रस्त; कंपनीवर कारवाईची मागणी

googlenewsNext

कळंबोली : पनवेल महापालिका हद्दीतील शहर आणि सिडको वसाहतींतील नागरिक सध्या पाणीटंचाईने त्रासले आहेत. यासंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात संबंधित यंत्रणांना अपयश आले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीला फुटीचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे रहिवासी संकुलांमध्ये तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे.

खांदा वसाहतीत महानगर गॅसलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, हे काम सुरू असताना जलवाहिनी फुटल्याने महिन्याभरात अनेकदा पाणीटंचाईला सामोरे जावे लागले, त्यामुळे सिडको महापालिका आणि एमजीपीविरोधात तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.
पनवेल शहराला देहरंग धरणाचे पाणी येते; परंतु ते पुरेसे नसल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी विकत घेतले जाते.

नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली आणि करंजाडे हा परिसर पूर्णपणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्रापासून जी जलवाहिनी पनवेल आणि न्हावाशेवा परिसरात पाणीपुरवठा करते, ती अतिशय जुनी आणि जीर्ण झाली आहे. त्यामुळे त्यातून ४० टक्के पाणीगळती होत आहे. जलामृत योजनेअंतर्गत ही जलवाहिनी बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता; परंतु पुढे काय झाले हे एमजेपीच्या अधिकाऱ्यांनासुद्धा माहीत नाही, तसेच महापालिकासुद्धा अनभिज्ञ आहे.

सिडको मात्र एमजीपीकडे बोट दाखवत आहे. त्यामुळे पनवेल परिसरात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाइपलाइन दुरुस्तीकरिता ३६ तासांचा शटडाउन जाहीर केला होता; परंतु हे काम ४८ तासांपेक्षा जास्त काळ गेल्याने नवीन पनवेल आणि कळंबोलीमध्ये तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. रहिवाशांना पिण्यासाठीसुद्धा पाणी मिळाले नाही.

खांदा वसाहतीत या समस्येबरोबरच सेक्टर ९ येथे महानगर गॅसची पाइपलाइन टाकण्यासाठी जे खोदकाम करण्यात आले, त्यामुळे सिडकोची अंतर्गत जलवाहिनी फुटली. वसाहतीला पाणीटंचाई निर्माण झाली. त्यातच एमजेपीने शटडाउन घेतल्याने पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. त्यातच सेक्टर ६ येथे खोदकाम करताना सिडकोची पुन्हा अंतर्गत पाइपलाइन फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने, ती दुरुस्त करण्याचे काम पाणीपुरवठा विभागाने हाती घेतले. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून खांदा वसाहतीमध्ये पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत.

खांदा वसाहत पाणीपुरवठा सुरळीतपणे होत नाही. याला जबाबदार सिडको आहे. मध्यंतरी महानगर गॅसचे काम सुरू असताना जलवाहिनी फोडण्यात आली. आता सेक्टर ६ येथे दुसऱ्यांदा ही घटना घडली. वसाहतीला गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे नगरसेविका सीता पाटील यांनी सांगितले. पाणीटंचाईमुळे खांदा रहिवासी त्रस्त आहेत, याबाबत सिडको आणि पालिकेकडून उपाययोजना करण्याची गरज असल्याचे शिवसेना शहरप्रमुख सदानंद शिर्के यांनी सांगितले.

साठवणूक क्षमता अपुरी

नवीन पनवेल, खांदा वसाहतीत सिडकोच्या इमारती मोठ्या प्रमाणात आहेत. अनेक इमारतींमध्ये साठवणूक टाक्या नाहीत. किंवा असलेली साठवणूक क्षमता अपुरी आहे. तसेच सिडकोकडेसुद्धा पाणी साठवून ठेवण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही.
परिसरातील लोकसंख्या वाढल्याने जलकुंभांची संख्या वाढविण्याचीही गरज आहे. अडचणीच्या काळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी आले नाही, तर मोठी तारांबळ उडत आहे. पनवेल शहरातच दिवसाआड पाण्याचे नियोजन करण्यात आल्याने पाणी कसे पुरवावे, हा प्रश्न महापालिकेला पडला आहे.

नवीन पनवेल मागणीप्रमाणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून कमी पाणी मिळते; परंतु सिडकोने योग्य नियोजन केले आहे. खांदा वसाहत, सेक्टर- ६ येथे जलवाहिनी फुटली होती. ती दुरुस्त करण्याचे काम रविवारी हाती घेतले. त्यामुळे काही प्रमाणात पाणीपुरवठा बंद होता; परंतु तो त्वरित सुरळीत करण्यात येईल.
- राहुल सरवदे, सहायक अभियंता, पाणीपुरवठा विभाग, नवीन पनवेल सिडको

मागणीपेक्षा पाणीपुरवठा कमी

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली आणि करंजाडे या ठिकाणी पाणीपुरवठा केला जातो. या ठिकाणी ९० एमएलडी पाण्याची गरज आहे; परंतु प्रत्यक्षात सुमारे ७० एमडी पाणी वसाहतींना मिळते. या कारणाने वर्षभर पाणीटंचाई निर्माण होत आहे. कामोठे वसाहतीलासुद्धा नवी मुंबई महापालिकेकडून मागणीप्रमाणे पाणी मिळत नाही. त्याचबरोबर खारघर नोडला अतिशय कमी पाणी मिळत आहे.

Web Title: Panvelkar troubled by disintegration; Demand action against the company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.