- आविष्कार देसाईअलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये १०३ दरडग्रस्त गाव आहेत. परंतु ४ आॅगस्टपासून पडणाऱ्या पावसामुळे या यादीमध्ये आता तीन गावांचा नव्याने समावेश झाला आहे. त्यामुळे सर्वच पातळीवर चिंता व्यक्त केली जात आहे. पुण्यातील भारतीय भूवैज्ञानिक सर्व्हेक्षण संस्थेने याबाबतचा सर्व्हे केला आहे. त्यातून ही बाब उघड झाली आहे. स्थलांतरीत करण्यात आलेल्यांना कायमस्वरुपी सुरक्षीत ठिकाणी घरे देण्याबाबत सरकार आणि प्रशासकीय पातळीवर विचार सुरु झाल्याने ग्रामस्थांसाठी आनंदाची बाब आहे.गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलेच बरसून जिल्ह्यातील अलिबाग, पेण, महाड, माणगाव, पोलादपूर आणि तळा तालुक्यातील जनजीवन प्रभावित केले आहे. अतिवृष्टीमुळे अलिबाग तालुक्यातील खानाव-वेलटवाडी, मुरुड तालुक्यातील मिठेखार या गावीतील डोंगरांना भेगा पडल्या होत्या आणि महाड तालुक्यातील काळीज येथे तर जमिनीतून आवाज येत असल्याने नागरिक भयभीत झाले होते.डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात ठिकठीकाणी खोलवर भेगा पडल्या आहेत. त्यामुळे तेथील भाग कोसळण्याची शक्यता निर्माण झाली होती. जिल्हा प्रशासनाने याची दखल घेत तेथील ग्रामस्थांना तातडीने या आधीच स्थलांतरीत केले आहे. सध्या त्यांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था समाज मंदिर, शाळा, ग्रामपंचायत कार्यालय येथे करण्यात आली आहे.पुण्यातील भूवैज्ञानिक सर्व्हेक्षण संस्थेचे डॉ.गजभिये आणि डॉ. रॉय यांनी काहीच दिवसांपूर्वी यातील मुरुड तालुक्यातील मिठेखार गावातील सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण केले आहे. अलिबाग-वेलटवाडी आणि महाड तालुक्यातील काळीज गावाचेही लवकरच सर्व्हेक्षण पूर्ण होऊन प्रशासनाला अहवाल प्राप्त होणार आहे. अहवाल आल्यानंतर या गावातील नागिरकांना डोंगराच्या खाली सुरक्षीत ठिकाणी सरकारी जमीन देण्यात येणार आहे. त्याच ठिकाणी त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे देण्याबाबत सरकारला प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले होते.गाव सोडून खाली घरे दिली तर तुम्हाला चालतील का? असे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांना विचारले होते. त्यावेळी त्यांनी गाव सोडण्यास कोणतीच हरकत नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे या नागरिकांना कायम स्वरुपी खाली घरे देण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात येत आहे असे सांगून तशी शनिवारी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासोबत चर्चा होऊन एकमतही झाल्याचे त्यांनी सांगितले.106 गावे दरडग्रस्तरायगड जिल्ह्यात दरडग्रस्त गावांच्या संख्येत झाली वाढत १९८४, १९८९ आणि २००५ साली अतिवृष्टीमुळे आलेल्या आपत्तीमुळे दरडग्रस्त भागाच्या संख्येत वाढ झाली आहे.२०१९ साली आलेल्या अतिवृष्टीपर्यंत दरडग्रस्त गावांची संख्या ही १०३ होती मात्र आता हाच आकडा १०६ पर्यंत पोचला आहे.भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेमार्फत सर्वेक्षणअलिबाग, महाड आणि मुरुड तालुक्यातील गावातील डोंगरांमध्ये भेगा पडल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. त्यामुळे तेथील नागरिकांना तातडीने स्थलांतरीत करणे गरजेचे होेते. अलिबाग तालुक्यातील वेलटवाडी आदिवासी वाडीवर भीषण परिस्थिती आहे.त्या ठिकाणी आपत्ती ओढवली तर अख्खी वाडी खाली येऊन शेकडो नागरिकांचा जीव जाऊ शकतो. भविष्यात अशी कोणतीच अप्रिय घटना घडू नये म्हणून वेळीच पावले उचलणे गरजेचे असल्याने येथेही भूवैज्ञानिक सर्व्हेक्षण संस्थेमार्फत सर्व्हेक्षण करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.
दरडग्रस्त गावांची संख्या वाढली, अलिबाग, मुरुड, महाड तालुक्यातील गावांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 01:51 IST