नागोठण्यात प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 01:03 AM2020-10-01T01:03:26+5:302020-10-01T01:03:37+5:30

निर्णय होईपर्यंत मागे घेण्यास नकार : पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून ठिय्या

Movement of project victims in Nagothanya | नागोठण्यात प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन

नागोठण्यात प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन

Next

नागोठणे : येथील रिलायन्सच्या प्रकल्पग्रस्तांना नोकरी द्यावी तसेच ६ सप्टेंबरला घेण्यात आलेल्या शांतता मोर्चात ३४ जणांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने समितीचे राज्य संघटक राजेंद्र गायकवाड तसेच स्थानिक पदाधिकारी शशांक हिरे, गंगाराम मिणमिणे, प्रमोदिनी कुथे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो प्रकल्पग्रस्तांचा नागोठणे पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले.

सकाळी साडेअकरा वाजल्यापासून रणरणत्या उन्हात बसलेल्या प्रकल्पग्रस्तांनी ‘गुन्हे मागे घ्या, अन्यथा आम्हाला अटक करा’ असा ठाम निर्णय घेतला. मात्र सायंकाळपर्यंत पोलीस आणि आंदोलनकर्ते यांच्यात कोणताही ठोस निर्णय न झाल्याने पोलीस ठाण्यासमोरील आंदोलन चालूच ठेवण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या अखत्यारीतील स्थानिक लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी सकाळी ११ वाजता एसटी बस स्थानक ते पोलीस ठाणे अशी प्रकल्पग्रस्तांची रॅली काढून पोलीस ठाण्यासमोर हात जोडो आंदोलन सुरू करण्यात आले.
संघटक राजेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात शशांक हिरे, गंगाराम मिणमिणे, प्रमोदिनी कुथे, चेतन जाधव, सुरेश कोकाटे आदींसह शेकडो प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते.
या आंदोलनात कोणत्याही नेत्याने राजकारण आणण्याचा प्रयत्न केला, तर त्याची कुंडली बाहेर काढू, असा इशारा राजेंद्र गायकवाड यांनी आपल्या भाषणात दिला. रिलायन्सने आंदोलन दडपण्यासाठी आमच्यावर खोटे आरोप करून आमच्या प्रकल्पग्रस्तांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, त्यांच्यावर लावण्यात आलेले गुन्हे मागे घेत नाहीत तोपर्यंत आम्ही येथून हटणार नसल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. लॉकडाऊनच्या काळातील कामगारांचा पगार दोन दिवसांत दिला जाईल, असा रिलायन्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने शब्द दिला होता. मात्र, दोन महिने उलटूनही रिलायन्स शब्दाला जागली नसल्याची खंत गायकवाड यांनी
व्यक्त केली.

प्रकल्पग्रस्तांवरील गुन्हा मागे घ्या
च्जोडे मारो आंदोलनातील प्रकल्पग्रस्तांवरील गुन्हा जोपर्यंत मागे घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. शशांक हिरे, गंगाराम मिणमिणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आणि उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी,

च्निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्यात दिवसभरात दोन वेळा पोलीस ठाण्यात चर्चा होऊनही कोणताही निर्णय घेण्यात यश आले नसल्याने सायंकाळपर्यंत आंदोलनकर्त्यांचे शांततेच्या मार्गाने आंदोलन चालूच राहिले होते. यात महिलांची उपस्थितीही लक्षणीय
होती.

आंदोलन ३ आॅक्टोबरपर्यंत स्थगित : आठ तास रिलायन्स प्रकल्पग्रस्तांनी ठिय्या आंदोलन केल्यानंतर सव्वासात नंतर प्रकल्पग्रस्तांचे नेते आणि पोलीस अधिकाऱ्यांच्यात झालेल्या चर्चेनंतर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, रिलायन्सचे वरिष्ठ अधिकारी आणि रिलायन्स प्रकल्पग्रस्तांचे नेते यांच्यात ३ आॅक्टोबरला सकाळी ११ वाजता अलिबागला बैठक घेऊन ठोस निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिल्याने प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन ३ आॅक्टोबरपर्यंत स्थगित केले. याबाबतची माहिती संघटनेचे सरचिटणीस गंगाराम मिणमिणे यांनी दिली.

Web Title: Movement of project victims in Nagothanya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड