महाड : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी पोलादपूर तालुक्यातील जमिनी संपादित करण्याचे काम आता मार्गी लागणार आहे. या तालुक्यातील नऊ गावातील जमिनी मोजणीची प्रक्रिया संपली असून चौपदरीकरणासाठी जमीन संपादित करण्यासंबंधीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी १८ मेपर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत.मुंबई-गोवा महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाला वेग आला असून इंदापूर ते महाड येथील जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. मात्र पोलादपूर तालुक्याच्या हद्दीतील जमिनी मोजणीचे कामाला विलंब लागल्यामुळे येथील अधिसूचना प्रसिद्ध झालेली नव्हती. पोलादपूर तालुक्यात महामार्गाचे चौपदरीकरण करताना कशेडी घाटात सुमारे पावणे दोन किमी लांबीचा बोगदा काढला जाणार आहे. त्यामुळे तेथील जमीन मोजणीचे काम किचकट होते. मात्र या तालुक्यातील पार्ले, लोहारमाळ, पोलादपूर, चोळई, धामणदेवी, कातळी, दरेकरवाडी, भोगाव बु. दत्तवाडी, भोगाव खुर्द, सडवली या गावातील जमीन मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. या तालुक्यातील ५४ हेक्टर जमिनी संपादित करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग अधिनियम १९५६ चे कलम ३ नुसार या जमिनी संपादित करण्याबाबतची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिसूचनेत २१ दिवसांपर्यंत म्हणजे १८ मे २०१६ पर्यंत याबाबत महाड प्रांताधिकाऱ्यांकडे हरकती मागवण्यात आलेल्या आहेत व त्यानंतर अंतिम अधिसूचना प्रसिद्ध होईल. पोलादपूर शहरातील पंचायत समिती, पोलीस ठाणे, बसस्थानक यासह हॉटेल व्यावसायिकांना या रुंदीकरणाचा फटका बसणार आहे. त्यामुळे येथील जमीनधारकांच्या हरकती मोठ्या प्रमाणावर दाखल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. (वार्ताहर)तालुक्यातील ५४ हेक्टर जमिनी संपादित करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग अधिनियम १९५६ चे कलम ३ नुसार या जमिनी संपादित करण्याबाबतची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिसूचनेत २१ दिवसांपर्यंत म्हणजे १८ मे २०१६ पर्यंत याबाबत महाड प्रांताधिकाऱ्यांकडे हरकती मागवण्यात आलेल्या आहेत.
चौपदरीकरणासाठी भूसंपादन अधिसूचना
By admin | Updated: May 3, 2016 00:49 IST