‘लाख’मोलाच्या दहीहंडींनी वेधले गोविंदांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 11:49 PM2019-08-24T23:49:46+5:302019-08-24T23:49:50+5:30

जिल्ह्यात गोपाळकाला जल्लोषात। आकर्षक चित्ररथांचाही सहभाग

'lakhs' worth dahihandi tooks attention of Govind's | ‘लाख’मोलाच्या दहीहंडींनी वेधले गोविंदांचे लक्ष

‘लाख’मोलाच्या दहीहंडींनी वेधले गोविंदांचे लक्ष

Next

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये लाखो रुपयांचे बक्षीस दहीहंडी फोडण्यासाठी लावण्यात आले होते, त्यामुळे याच दहीहंडी नागरिकांच्या आकर्षणाच्या केंद्रस्थानी होत्या. काही ठिकाणी चित्ररथ सजावट स्पर्धेचे आयोजन करून गोपाळकाला उत्सवात पारंपरिकतेचा नूर आणल्याचे दिसून आले.


अलिबागमधील भाजपचे अ‍ॅड. महेश मोहिते आणि शेकापचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या दहीहंडींसाठी अनुक्रमे दीड लाख आणि एक लाख रुपयांचे बक्षीस लावण्यात आल्याने मुंबईतील काही गोविंदा पथकांनी येथे हजेरी लावल्याचे दिसून आले. या ‘लाख’मोलाच्या दहीहंडी फोडण्याचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.


सकाळपासूनच गोविंदा पथके हंडी फोडण्यासाठी बाहेर पडली. पावसाने पाठ फिरवली असतानाही गोविंदांचा उत्साह तूसभरही कमी झालेला नव्हता. दिवसभर जिल्ह्यात असेच चित्र पाहायला मिळत होते. विशेष म्हणजे, महिला गोविंदा पथकांची संख्याही वाढली असल्याचे त्यांच्या उपस्थितीवरून दिसून आले. महिलावर्गासाठी खास हंडी बांधण्यात आल्या होत्या. शहरी भागात उत्साहाला उधाण होते. दहीहंडी पाहण्यासाठी लहान मुले आणि महिलांची मोठ्या संख्येने गर्दी होती.


ग्रामीण भागात मात्र गोपाळकाल्याचा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. त्या ठिकाणी सनई, खालूबाजाच्या तालावर गोविंदा पथके फेर धरून नाचताना दिसून आली. प्रसाद म्हणून मिळणारे दही, ताक-पोहे यांच्यावरही त्यांच्याकडून ताव मारण्यात आला.
जिल्ह्यातील लाख-दीड लाख रु पयांची बक्षिसे असलेल्या दहीहंडी सर्वांचेच आकर्षण ठरल्या. अलिबाग, पनवेल, पेण, उरण, कर्जत, रोहे, महाड, गोरेगाव, पाली या शहरांतील लाखमोलाच्या दहीहंडी फोडण्यासाठी विविध पथकांनीही हजेरी लावली होती. शुक्रवारी रात्री उशिरा श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये या निमित्ताने भजन, कीर्तन, पूजापाठ असे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

सोंगाची परंपरा
कोकणामध्ये दहीहंडी उत्सवामध्ये सोंग काढण्याची परंपरा बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे. अलिबाग कोळीवाडा परिसरातून आजही पौराणिक, ऐतिहासिक तसेच सद्यस्थितीवर भाष्य करणारी सोंगे काढण्यात आली होती. त्यामध्ये यंत्रावरील चलचित्रांचा वापर न करता कलाकारांचा त्यामध्ये थेट सहभाग घेऊन देखावा उभा करण्यात आला होता. शहरातील विविध भागातून हे चित्ररथ फिरवण्यात आले, ते पाहण्यासाठी नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती.

Web Title: 'lakhs' worth dahihandi tooks attention of Govind's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.