आविष्कार देसाई / अलिबागरायगड जिल्हा परिषद निवडणुकीच्या आखाड्यामध्ये तब्बल ७४ उमेदवार हे कोट्यधीश आहेत. लखपती असणाऱ्यांची संख्याही सर्वाधिक ९९ आहे. पैकी फक्त १३ कोट्यधीश उमेदवारांनी उच्चशिक्षण घेतले आहे. उर्वरित उमेदवार हे प्राथमिक शिक्षणापासून ते १२ वीपर्यंत शिकलेले आहेत. दोन उमेदवारांना साधे लिहिता-वाचता येते नाही, ते कोट्यधीश आहेत, तर चार उमेदवार हे लखपती आहेत. यासर्व उमेदवारांच्या संपत्तीचा हिशेब केल्यास त्यांची संपत्ती कैक अब्ज रुपयांच्या घरात जाते. त्यामुळे हेच कुबेर आता जिल्हा परिषदेचा कारभार पाहणार आहेत.रायगड जिल्हा परिषदेच्या ५९, तर पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, भाजपा हे पक्ष निवडणुकीच्या रणांगणावर उतरले आहेत. जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प हा सुमारे १०० कोटी रुपयांच्यावर सादर करण्यात आला होता. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेला केंद्र, राज्य सरकारमार्फतही कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त होत असतो. या सर्वांचा विचार करता उमेदवारांकडे असणारी संपत्ती याहीपेक्षा जास्त आहे. उच्च शिक्षण घेऊनच जीवनामध्ये यशस्वी होता येते हे अशिक्षित उमेदवारांनी एकप्रकारे खोटे ठरवल्याचे अधोरेखित होते. जिल्ह्यामध्ये ७४ उमेदवारांकडे कोट्यवधींची संपत्ती आहे, तर ९९ उमेदवार हे लखपती आहेत. अशिक्षित सहा उमेदवार आहेत. त्यामध्ये पनवेल तालुक्यातील वडघर मतदार संघातील उमेदवार पदीबाई ठाकरे यांची संपत्ती एक कोटी ५९ लाख ५८ हजार ५०० रुपये, तर कर्जत तालुक्यातील पाथरज मतदार संघातील निर्मला धुळे यांच्याकडे एक कोटी ८६ लाख ५० हजार ५७० रुपयांची संपत्ती आहे. उर्वरित चार उमेदवार लखपती आहेत.
शिवतीर्थाच्या कारभारावर कुबेरांची नजर
By admin | Updated: February 17, 2017 02:17 IST