- मधुकर ठाकूर उरण : जेएनपीएच्या आठ हजार कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या सर्वांत मोठी लांबी आणि क्षमतेच्या चौथ्या बंदराच्या दुसऱ्या अंतिम टप्प्यातील काम पूर्णत्वात आले आहे. पोर्ट सिंगापूर असोसिएशन, भारत मुंबई कंटेनर टर्मिनल अशा टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या या बंदरामुळे जेएनपीए बंदराची कंटेनरहाताळणीची क्षमता येत्या काही महिन्यांतच एक कोटी चार लाखांपर्यंत पोहोचणार आहे.चौथ्या बंदराच्या चार हजार कोटींच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१७ मध्ये झाला होता. मात्र, कोविड महामारीत अडकल्यामुळे कामाला विलंब झाला. या विलंबामुळे जेएनपीएच्या आर्थिक नफ्यालाही थोड्याफार फरकाने फटका बसला आहे.
जेएनपीएची कंटेनर हाताळणी बंदराची सागरी क्षमता वाढविण्याची आणि आंतरराष्ट्रीय बेंचमार्क प्रस्थापित करण्याची व बदलण्याची क्षमता या विकसित केलेल्या चौथा कंटेनर टर्मिनलमध्ये आहे. बंदर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर वार्षिक ४८ लाख कंटेनरची हाताळणी होणार आहे.
धोरणात्मक महत्त्वचौथे कंटेनर टर्मिनल हा केवळ विस्तार नाही, तर जागतिक सागरी केंद्र म्हणून जेएनपीएचे स्थान मजबूत होणार आहे. सागरी व्यापाराचे वाढते प्रमाण आणि कंटेनर जहाजांच्या वाढत्या आकारामुळे भविष्यातील पायाभूत सुविधांची गरज भागविणारे हे टर्मिनल असणार आहे.
आर्थिक वाढीला चालनावाढीव कार्यक्षमता थेट लॉजिस्टिक खर्च कमी करून आयात-निर्यातीवर अवलंबून असलेल्या उद्योगांसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. शिवाय रोजगार संधी वाढविण्यासाठी, वाहतूक, गोदामांसह सहायक क्षेत्रांना चालना मिळणार आहे.
नावीन्यपूर्ण बदलबंदराच्या उभारणीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा व यंत्रसामग्रीचा वापर केला असून, यामध्ये दोन सुपर पोस्ट-पनामॅक्स रेल माऊंटेड क्वे क्रेन (आरएमक्यूसी) आणि सहा ऊर्जा-कार्यक्षम ई-रबर टायर्ड गॅन्ट्री (आरटीजी) क्रेन्सचा समावेश आहे. कंटेनर हाताळणीची क्षमता १० दशलक्ष टीईयू इतकी अविश्वसनीय वाढली आहे. हा पुढचा टप्पा भारताच्या सागरी उद्योगाला वाढीव कार्यक्षमतेसह अधिक सक्षम करणार आहे.४८ लाखकंटेनर हाताळणीची क्षमता चाैथ्या बंदराची असणार आहे. त्यामुळे येत्या कालावधीत एकूणच जेएनपीए बंदरातून कंटेनर हाताळणी काेट्यवधीवर जाणार आहे.
चौथ्या कंटेनर टर्मिनलच्या दुसऱ्या टप्प्यातील काम अंतिम टप्प्यात आले आहे. बंदर क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर १० दशलक्ष टीईयू (एक कोटी कंटेनर) हाताळण्यास सक्षम होणार आहे. त्यामुळे भारताच्या सागरी व्यापारामागील एक प्रमुख शक्ती जेएनपीएचे स्थान आणखीनच मजबूत होणार आहे.उन्मेष शरद वाघ, अध्यक्ष, जेएनपीए