लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : येथील समुद्रात तालुक्यातील आक्षी साखर येथील हिरकन्या ही मच्छीमारी बोट सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सोमवारी रात्री बुडाली. दुसऱ्या मच्छीमारी बाेटीतील खलाशांनी वेळीच प्रसंगावधान राखून मदत केल्याने १५ खलाशांचा जीव वाचला. या वेळी बोटमालकाचे मात्र २० लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले.
‘हिरकन्या’मधील खलाशी हे मासेमारी करताना थकून बोटीतच झोपले होते. त्याचवेळी जोरदार वाऱ्यामुळे बोट भरकटली. त्यानंतर काही काळाने बोटीत पाणी भरल्याने ती बुडू लागली. ही घटना समोरून येणाऱ्या बोट चालकाच्या लक्षात येताच, त्याने आरडाओरडा करून हिरकन्यामधील खलाशांना जागे केले. त्यानंतर त्यांना बोटीत घेतले. मात्र, हिरकन्या बुडाली. सुमारे १७ तासांच्या अथक परिश्रमानंतर बोट बाहेर काढण्यात मच्छीमारांना यश आले. पहाटेच्या सुमारास हिरकन्या बोट बुडाल्याचे कळताच आम्ही दुसऱ्या बोटीने घटनास्थळी पोहोचलो, असे बोट मालक जगदीश बामजी यांनी सांगितले.
सध्या पहाटेच्या सुमारास वारा वाहतो. हिरकन्या बोट अशाच तडाख्यात सापडली होती. काही वर्षांपासून अशा घटना वारंवार घडत आहेत. आमच्या मदतीला सरकार कधीच धावून येत नाही. - जनार्दन नाखवा, मच्छीमार