आरोग्याचा प्रश्न गंभीर : खंडाळा गावात नळाच्या पाण्यात जिवंत मासे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 01:01 AM2020-02-22T01:01:29+5:302020-02-22T01:02:06+5:30

आरोग्याचा प्रश्न गंभीर : पाणी संकटामुळे ग्रामस्थ संतप्त

Health Question Critical: Living fish in tap water in Khandala village! | आरोग्याचा प्रश्न गंभीर : खंडाळा गावात नळाच्या पाण्यात जिवंत मासे !

आरोग्याचा प्रश्न गंभीर : खंडाळा गावात नळाच्या पाण्यात जिवंत मासे !

Next

निखिल म्हात्रे 

अलिबाग : तालुक्यातील खंडाळा ग्रामपंचायत हद्दीत नळाच्या पाण्यातून कचरा, शेवाळ असे प्रकार आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. मात्र, अलिबाग तालुक्यातील खंडाळा गावात नळातून चक्क छोटी जिवंत कोळंबी (मासे) येत असल्याने खळबळ उडाली आहे. येथील ग्रामस्थांना पंधरा दिवसांनी पाणी पिण्यासाठी मिळते. त्यातच असे मासेमिश्रित पाणी आल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुढील काही दिवसांमध्ये उन्हाच्या तीव्र झळा जाणवणार असल्याने पाणी संकट अजून गहिरे होणार असल्याने ग्रामस्थ चिंताग्रस्त आहेत.

खंडाळा ग्रामपंचायत हद्दीतील नागरिक गेली अनेक वर्षे पाण्याच्या समस्येने ग्रासलेले आहेत. येथील ग्रामस्थांना १० ते १५ दिवसांनी एकदा एमआयडीसीचे पाणी ग्रामपंचायतीमार्फत दिले जाते. नळाद्वारे आलेले पाणी ग्रामस्थांना साठवून ठेवावे लागत आहे. मात्र, आता तर नळाद्वारे येणाऱ्या पाण्यामधून जिवंत छोटी कोळंबी (मासे) येण्यास सुरु वात झाल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शुक्रवारी १० दिवसांनी पाणी आल्याने महिलांनी पाणी भरण्यास सुरु वात केली. मात्र पाण्यात कोळंबी दिसल्यांने पाणी पुढील १० दिवस कसे साठवून ठेवायचे, असा प्रश्न महिलांना सतावत आहे.
दरम्यान, पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

महिन्यातून फक्त दोन वेळा पाणी
च्महिन्यातून फक्त दोन वेळा आम्हाला पिण्याचे पाणी मिळते.
च्त्या पाण्यातही आता किडे, मुंग्या, मासळी असल्याने आमच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
च्जिल्हा प्रशासनाने ही गंभीर बाब लक्षात घेऊन खंडाळा गावातील ग्रामस्थांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा.
च्प्रशासनाने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये अन्यथा आम्हाला ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

विकत पाणी घेण्याची पाळी : खंडाळा ग्रामपंचायतीची पाणी समस्या सोडविण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा योजना राबवण्यात आली होती. या योजनेत कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचा आरोप झाला होता. पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचारामुळे खंडाळा ग्रामस्थ आजही तहानलेलेच आहेत. ग्रामस्थांना पायपीट करून बाहेरून पाणी विकत आणावे लागत आहे. ग्रामस्थांची ही समस्या ना प्रशासन सोडवत आहे ना लोकप्रतिनिधी. यामुळे नागरिक संतापलेले आहेत. उन्हाळ्यात पाणी समस्या चांगलेच डोके वर काढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत.
 

Web Title: Health Question Critical: Living fish in tap water in Khandala village!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड