नांदगाव : मजगाव ग्रामपंचायतीमध्ये राहणारे मंगेश घाटकर यांनी शेजारील व्यक्ती जिना बांधून येण्या-जाण्याचा मार्ग अडवतात म्हणून मजगाव ग्रामपंचायतीकडे तक्रार अर्ज केला होता. याचा राग मनात धरून पाच जणांच्या समूहाने त्यांना मारहाण केली. या प्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मजगाव ग्रामपंचायत हद्दीत राहणारे मंगेश घाटकर यांच्या शेजारी राहणारे रोहिदास घाटकर, नितीन घाटकर, शंकर घाटकर व सुगा घाटकर हे जिन्याचे बांधकाम करीत होते. यासाठी ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. तसेच त्यांच्या जिना बांधण्यामुळे रिक्षा येण्या- जाण्याचा मार्ग बंद होणार होता. म्हणून मंगेश यांनी या बांधकामाविरोधात ग्रामपंचायतीकडे तीन तक्रार अर्ज केले होते. याचा राग मनात धरून वरील व्यक्तींकडून मंगेश यांना फावड्याने व दगडाने मारहाण करण्यात आली. मंगेश यांच्या डोक्याला दुखापत होवून दोन टाके पडले आहेत. ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल झाली असून सर्वांना मुरुड न्यायालयात हजर केले असता त्यांना जामीन मंजूर झाला आहे.
ग्रामपंचायतीमध्ये तक्रार केल्याने मारहाण
By admin | Updated: February 27, 2016 01:17 IST