नवी मुंबई : पनवेल, उरण, नवी मुंबईमध्ये जवळपास १३०० सार्वजनिक व जवळपास ६० हजार घरांमध्ये गणेशमूर्तींची प्रतिष्ठापणा केली जाते. उत्सवामध्ये जवळपास १०० कोटी रुपयांचा खर्च होत असतो. यावर्षी राज्यात भीषण दुष्काळ पडला असून शेतकरी संकटात आहे. यामुळे गणेशोत्सव मंडळांनी उत्सवावरील अनावश्यक खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे. गृहनिर्माण सोसायट्यांसह जवळपास १३०० सार्वजनिक गणेश मंडळे व ६० हजार घरांमध्ये श्रींची प्रतिष्ठापणा केली जाते. पुढील दहा दिवस पूर्ण शहर गणेशमय होणार आहे. गणेशोत्सवामध्ये प्रचंड आर्थिक उलाढालही होत असते.सार्वजनिक उत्सव मंडळ २ लाख ते २५ लाख रुपयांपर्यंत खर्च करत आहेत. घरगुती गणेशोत्सवावरही ५ हजार ते ५० हजार रुपयांचा खर्च होत आहे. तेंव्हा हा खच कमी करून गणेशोत्सव मंडळांनी व घरामध्ये गणेशमूर्तींची प्रतिष्ठापणा करणाऱ्यांनीही दुष्काळग्रस्तांना शक्य तेवढी मदत करावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे. विघ्नहर्ता मंडळ देणार २५ हजार रुपये नवीन पनवेल सेक्टर १५ मधील विघ्नहर्ता मित्र मंडळ मागील ११ वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करत आहेत. उत्सवाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्याचे काम करत आहेत. राज्यात भीषण दुष्काळ पडला असून शेतकरी संकटात आहे. यामुळे मंडळाने दुष्काळग्रस्तांना २५ हजार रुपये मदत देण्याचे निश्चित केले आहे. तसेच यावर्षी मंडळाने दुष्काळी परिस्थितीवरील देखावाही करण्यात आला आहे. विघ्नहर्ता मंडळाप्रमाणे इतर गणेशोत्सव मंडळे व नागरिकांनीही दुष्काळग्रस्तांना मदत करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
दुष्काळग्रस्तांना द्या मदतीचा हात
By admin | Updated: September 16, 2015 23:59 IST