वणव्यामुळे वनसंपदा धोक्यात; उपाययोजनांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 12:19 AM2020-02-24T00:19:23+5:302020-02-24T00:19:26+5:30

जनजागृतीसाठी मोहीम राबविण्याची आवश्यकता

Forests threaten forestry; Need for solutions | वणव्यामुळे वनसंपदा धोक्यात; उपाययोजनांची गरज

वणव्यामुळे वनसंपदा धोक्यात; उपाययोजनांची गरज

Next

पोलादपूर : हिवाळ्याच्या मध्यावर व उन्हाळ्याच्या सत्रात ठिकठिकाणी वणवा लावण्यात येत आहे. या वणवा संस्कृतीमुळे नैसर्गिक वनसंपदा धोक्यात येत असून वणवा विरोधी मोहीम बारगळली असल्याचे पुन्हा दिसून आले. पोलादपूर वनविभाग याबाबत सुस्त असल्याचे दिसून येत आहे.

दरवर्षी जानेवारी महिन्याच्या शेवटी जाणीवपूर्वक आंबेनळी व कशेडी घाटात मोठ्या प्रमाणावर वणवे लावले जातात. त्यामुळे तालुक्यातील वनसंपदा, पशू, पक्षी यांच्या कित्येक जाती नष्ट होऊ लागल्या आहेत. तसेच आयुर्वेदिक औषधी वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. काही दिवसांपूर्वी रात्री ११ च्या सुमारास साखर कामथे मार्गावरील रस्त्यालगत वणवा लावण्यात आला होता. या वणव्याच्या भक्ष्यस्थानी झाड आल्याने बुंधा जळून ते रस्त्यावर पडल्याने सदरचा मार्ग बंद झाला होता.

तालुक्यातील वणव्याचे सातत्य कायम राहिले असून गुरुवारी सायंकाळी पुन्हा चरई येथील महादेवाच्या डोंगरावर अज्ञाताने वणवा लावल्याने डोंगरावरचे सुकलेले गवत, झाडाची पाने जळून खाक झाली आहेत. महाशिवरात्रीला या डोंगरावर मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी गर्दी होत असते. सदरचा वणवा रात्री उशिरा शमला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांपासून वणव्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. कोकणातील भूमीला सीतामाईचा शाप व उ:शाप असल्याचे सांगितले जात असून सदरची भूमी जळो व पुन्हा बहरो अशी आख्यायिका आजही बुजुर्ग मंडळी सांगत आहेत. मात्र सातत्याने लावल्या जाणाऱ्या वणव्याच्या भक्ष्यस्थानी वनसंपदा, झाडे, सरपटणारे प्राणी सापडत असल्याने सदरचे प्रकार थांबवावे यासाठी वणवा विरोध कायदा केला गेला. मात्र याची अंमलबजावणी हवी तशी झाली नसल्याने व कायद्याचे भय उरले नसल्याने वणव्याच्या प्रकारांत वाढ होताना दिसून येत आहे. १९२७ च्या वणवाविरोधी कायद्यामध्ये बदल होत गेले आहेत. सुधारित कायद्यात २ वर्षे शिक्षा व ५ हजार रुपये दंड करण्यात आला आहे.

महाडसह पोलादपूर तालुक्यात ठिकठिकाणी वणवे लावण्यात येत असल्याने डोंगरच्या डोंगर उजाड होत आहेत. काही वर्षांपूर्वी कशेडी घाट परिसरात भरदुपारी वणवा लावल्याने प्रवासीवर्गाला उन्हाच्या चटक्यांसह वणव्याची धग बसली होती, तर गावागावात लावण्यात येणाºया वनव्याच्या भक्ष्यस्थानी गुरांचा गोठा, वनराई आल्याच्या घटना घडल्या होत्या.

पोलादपूर तालुक्यातील साखर कामथे मार्गावर अज्ञाताने लावलेल्या वणव्यात रस्त्यालगत असणारे झाड आल्याने झाडाचा बुंधा जळून सदरचे झाड मुख्य रहदारीच्या मार्गावर पडले होते. या मार्गावरून पोलादपूरकडे येणाºया वाहनचालकाने काही सहकाऱ्यांच्या मदतीने सदरचे झाड बाजूला करत एक बाजू चालू केली. रात्री उशिरा काही ग्रामस्थांनी सदरचा वणवा विझविण्याचा प्रयत्न केला.

जंगलात फिरणारे गुराखी व इतर लोक विडी, सिगारेट, आगकाडीचे थोटूक तसेच फेकतात. मध गोळा करणारे टेंभे घेऊन जातात आणि काम झाल्यावर तसेच फेकतात. पीक चांगले यावे म्हणून वणवे लावले जातात. जमिनीवर पडलेल्या पानांचा त्रास होतो म्हणून त्याला आग लावली जाते. गवत पेटवले तर नवीन गवत चांगले येईल, असा गैरसमज आहे. त्याकरिता ते गवत पेटवून देतात. जंगलालगत शेती असेल तर तेथेही सुपीक पिकांसाठी जमीन साफ केली जाते. त्यासाठी लावलेली आग पसरत जाऊन जंगलापर्यंत पोहोचते आणि वणवा भडकतो.

कसे पेटतात वणवे?
कोरड्या पानगळीच्या जंगलात सर्वदूर पानांचा थर साचतो. गवतही वाळलेले असते. त्यात वातावरणातील कोरडेपण भर टाकते. काही तरी निमित्त घडते आणि वणवा लागतो. हे निमित्त नैसर्गिक असते, तसेच मानवनिर्मितही.
नैसर्गिकरीत्या जंगलाला लागणाºया आगीचे प्रमाण केवळ १५ टक्के आहे, तर मानवनिर्मित आगीचे प्रमाण ८५ टक्के आहे. साधारणत: मार्च हा सर्वाधिक वणव्यांचा महिना असतो. या महिन्यात एकूण वणव्यांच्या ४६ ते ६६ टक्के वणवे लागतात. हे प्रमाण एप्रिलमध्ये कमी होते.

Web Title: Forests threaten forestry; Need for solutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.