पारोळ : वसई तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींवर आर्थिक संकट ओढावले असून पंचायतीचा आर्थिक डोलारा सांभाळणाऱ्या घरपट्टीची वसुली बंद आहे. आता मालमत्तेवर घरपट्टी आकारणी करण्याचा विचार शासन करत असल्याने चार महिने घरपट्टी वसुली ठप्प आहे. ही आकारणी अमलात येईपर्यंत ग्रामपंचायतीचा आर्थिक भार कसा पेलायचा, असा प्रश्न सरपंच व उपसरपंच यांना पडला आहे. तर, नवीन घरपट्टी पावती मिळत नसल्याने नागरिकांची इतर कामे अडकली आहेत.काही वर्षांपूर्वी शासनाने स्क्वेअर फुटांप्रमाणे घरपट्टी आकारणीचे आदेश दिले. तसेच ग्रामपंचायतींना विकासासाठी मिळणाऱ्या निधीतही कपात करण्यात आली. पण, शासन आता मालमत्तेच्या किमतीनुसार घरपट्टी आकारणीचा विचार करत असल्यामुळे एप्रिलपासून सर्व ग्रामपंचायतींना घरपट्टी वसूल न करण्याचा आदेश आहे. परिणामी, कर्मचाऱ्यांचे पगार थकले, तसेच काही ग्रामपंचायतींचे तर वीजबिल, वृक्षारोपणाचेही बिल थकले आहे. पावसाळ्याचा विचार करता नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या फवारणीसाठीही निधी उपलब्ध नसल्याचे ग्रामपंचायत सदस्य सांगतात.याबाबत, वसईच्या गटविकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता याबाबतचा आदेश अजून आला नसल्याचे सांगून पुढे बोलण्याचे टाळले. (वार्ताहर)
वसईतील ग्रा.पं.च्या आर्थिक नाड्या आवळल्या
By admin | Updated: September 3, 2015 23:05 IST