बिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडी विभागात विद्युतपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने या ठिकाणावरील नागरिक प्रचंड संतापले आहेत. बिरवाडी विभागातील कनिष्ठ अभियंत्याचे पद गेली ९ महिने रिक्त असल्याने या ठिकाणी नवीन विद्युत जोडणी घ्यावयाची असल्यास या परिसरातील नागरिकांना १५ ते २० कि.मी.चा प्रवास करुन महाड येथील महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात यावे लागते. काही तांत्रिक बिघाड झाल्यास कनिष्ठ अभियंता नसल्याने या ठिकाणचा विद्युतपुरवठा अनिश्चित काळाकरिता खंडित राहतो. बिरवाडी विभागाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्याकरिता तालुक्यातील अन्य विभागातील कनिष्ठ अभियंत्यांकडून टाळाटाळ केली जाते. सद्यस्थितीत बिरवाडी विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांचा कार्यभार कुंबळे विभागाचे कनिष्ठ अभियंता एम.बी. गवारी यांच्याकडे देण्यात आला आहे. दरम्यान, कुंबळे विभाग हा अतिशय दुर्गम असल्याने या ठिकाणी देखील वारंवार विद्युतपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अधिक असल्याने कनिष्ठ अभियंता एम.बी. गवारी हे व्यस्त असतात. यामुळे बिरवाडी विभागाला लवकरच कायमस्वरुपी कनिष्ठ अभियंता उपलब्ध व्हावा, अशी मागणी नुकत्याच झालेल्या महाड तालुक्याच्या आमसभेमध्ये करण्यात आली होती. (वार्ताहर)
बिरवाडीत विजेचा लपंडाव सुरूच
By admin | Updated: July 30, 2015 23:34 IST