नांदगाव : मुरुड नगरपरिषदेची नगराध्यक्षपदाची निवडणूक ८ मे रोजी संपन्न होणार आहे. बुधवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरलेले महेश भगत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे महेश भगत गटाकडून नगराध्यक्षपदासाठी अशोक धुमाळ तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अविनाश दांडेकर यांचे अर्ज कायम राहिल्याने या दोघांमध्ये सरळ सरळ लढत होणार आहे.विधानसभा निवडणुकीपासूनच राष्ट्रवादीच्या बारा नगरसेवकांपैकी सहा नगरसेवक दळवी यांच्या संपर्कात येऊन या निवडणुकीत त्यांना उघड उघड मदत केली होती. तेव्हापासून राष्ट्रवादी नगरसेवकांमध्ये दोन गट पडले होते. शिवसेना जिल्हाध्यक्ष महेंद्र दळवी हे मुरुड नगरपरिषदेत राजकीय परिवर्तन घडवून आणून एकाचवेळी आमदार जयंत पाटील व आमदार सुनील तटकरे यांच्यावर मात करायची नामी संधी त्यांना उपलब्ध झाल्याने त्यांचा करिष्मा या निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण जिल्हा पाहणार आहे. राष्ट्रवादी पक्षातर्फे अविनाश दांडेकर हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असून तालुकाध्यक्ष मंगेश दांडेकर यांचे कट्टर समर्थक असून त्यांना जिंकून आणण्यासाठी मंगेश दांडेकर यांची रणनीती काय असेल हेसुद्धा ८ मे रोजी स्पष्ट होणार आहे. (वार्ताहर)
नगराध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची
By admin | Updated: May 6, 2015 23:28 IST