कांता हाबळे।लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : कर्जत-कल्याण राज्यमार्गाला अनेक ठिकाणी अनधिकृत कामांचा विळखा पडला असून, त्याचा फटका पावसाळ्यात नागरिकांना बसत आहे. राज्यमार्गावरील नेरळ येथील एका खासगी शाळेच्या बांधकामामुळे पाणी अडल्याने रस्त्याला ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. तसेच अनेक नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याचेही समोर आले आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने पावसाळ्यात मोठी समस्या निर्माण झाली आहे.नेरळ ग्रामपंचायत हद्दीत अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे सुरू असून याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे. त्यामुळेच नेरळ शहरात व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. सांडपाणी आणि पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर तसेच नागरिकांच्या घरात आले आहे. अशीच परिस्थिती नेरळ स्टेशन परिसर, साईमंदिर, निर्माण नगरीभागात पाहायला मिळत आहे.गेल्या आठवडाभरापासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने सर्वत्र नदी, नाले, ओसंडून वाहत आहेत. तसेच नेरळ, धोमोते भागात विकासकांनी अनधिकृत बांधकामुळे नैसर्गिक नाले बुजवून टाकले आहेत, हे पाणी आता महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहू लागले आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या शाळेच्या बांधकामांमुळे हा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. शार्विल शाळा अगदी महामार्गाला लागून आणि अति उच्चदाबाच्या विद्युतवाहिनीजवळ असल्याने बांधकामामुळे ही शाळा चर्चेचा विषय बनली आहे. बिल्डरांबरोबर रेल्वेनेसुद्धा पाय पसरले असल्याचे समोर येत आहेत. गेल्या वर्षी तक्रारी करूनही ग्रामपंचायत आणि रेल्वेने कोणतीही उपाययोजना न केल्याने यावर्षीही नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे.एकीकडे अनधिकृत बांधकामांचा विळखा आणि ग्रामपंचायती बरोबर रेल्वेचे दुर्लक्ष यामुळे दाद तरी कोणाकडे मागावी, असा प्रश्न नेरळकरांसमोर आहे. बांधकाम विभाग, ग्रामपंचायतीने लक्ष देऊन योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
कर्जत-कल्याण दरम्यान राज्यमार्गावर पाणीच पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 23:03 IST