माती उत्खननामुळे दरडीचा धोका, शासनाने पाहणी करूनच परवानगी द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 06:58 AM2018-02-01T06:58:11+5:302018-02-01T06:58:22+5:30

सध्या कोकण रेल्वेच्या दुस-या पटरीसाठी लागणा-या मातीच्या भरावाचे काम तेजीत सुरू आहे. त्याचबरोबर मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या दुस-या टप्प्याच्या कामालाही सुरुवात झाली आहे. दोन्ही कामांसाठी महाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात भरावासाठी मातीचे उत्खनन होणार आहे.

 Due to soil erosion, the risk of drowsiness should be allowed by the government | माती उत्खननामुळे दरडीचा धोका, शासनाने पाहणी करूनच परवानगी द्यावी

माती उत्खननामुळे दरडीचा धोका, शासनाने पाहणी करूनच परवानगी द्यावी

Next

- सिकंदर अनवारे
दासगाव - सध्या कोकण रेल्वेच्या दुसºया पटरीसाठी लागणा-या मातीच्या भरावाचे काम तेजीत सुरू आहे. त्याचबरोबर मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या दुसºया टप्प्याच्या कामालाही सुरुवात झाली आहे. दोन्ही कामांसाठी महाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात भरावासाठी मातीचे उत्खनन होणार आहे. २००५मध्ये या तालुक्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळून शेकडो नागरिक मृत्युमुखी पडले होते, तर अनेक घरे जमीनदोस्त झाली. या सर्व घटना डोंगर भाग असलेल्या जवळच्या गावांत घडल्या. रेल्वे आणि महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात भरावासाठी मातीचे मोठ्या प्रमाणात उत्खनन झाले, तर पुन्हा तालुक्यामध्ये मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यापुढे लागणाºया भरावासाठी करण्यात येणारे मातीचे उत्खनन यासाठी देण्यात येणारा परवाना उत्खनन ठिकाणच्या जागेची पाहणी करूनच नंतर देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
महाड तालुका मोठ्या प्रमाणात डोंगर भागात वसलेला आहे. जास्तीत जास्त गावे डोंगराच्या कडेला वसलेली आहेत. २००५ साली तालुक्यातील डोंगराच्या कडेला असलेल्या अनेक गावांवर दरडी कोसळल्या यामध्ये शेकडो नागरिकांना आपले जीव गमवावे लागले असून, अनेक घरे जमीनदोस्त झाली. यानंतर शासनाकडून सर्व तालुक्याचा भूगर्भशास्त्रज्ञाकडून सर्व्हे करण्यात आला. दरडी कोसळलेल्या गावांना धोका असून, इतर ही अनेक गावांना धोका निर्माण झाल्याचे या सर्व्हेमध्ये निष्पन्न झाले. संभाव्य धोका असणाºया तालुक्यातील या सर्व गावांना महसूल विभागामार्फत पावसाळ्यापूर्वी दरड कोसळण्याच्या भीतीने स्थलांतराच्या नोटिसा बजावण्यात येतात. अशी परिस्थिती तालुक्यात गेल्या ११ वर्षांपासून सुरू आहे. अशी परिस्थिती असताना सध्या कोकण रेल्वेचे दुसºया पटरीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात मातीच्या भरावाचे काम सुरू आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या दुसºया टप्प्याच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. या चौपदरीकरण भरावाच्या कामासाठी तालुक्यात लाखो ब्रास मातीचे उत्खनन होणार असून, यासाठी डोंगराचे मोठ्या प्रमाणात खोदकाम होऊन त्या ठिकाणच्या झाडांची कत्तलही केली जाणार आहे. या मातीच्या उत्खननामुळे या ठिकाणी वसलेल्या गावांना फार मोठा धोका निर्माण होणार आहे.
कोकण रेल्वेच्या दुसºया पटरीच्या भरावाला तेजीत सुरुवात झाली असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात मातीचे उत्खनन दासगावमध्ये सुरू आहे. दासगावमधील दरडग्रस्तांच्या नवीन वसाहत ठिकाणीच्या डोंगर भागात मोठ्या प्रमाणावर मातीचे उत्खनन सुरू आहे. यावर दासगाव तलाठ्यांमार्फत काम थांबवून कारवाई करण्यात यावी, यासाठी महाड तहसील कार्यालयात दासगाव तलाठ्यांकडून अहवाल पाठवण्यात आल्याची माहिती दासगाव तलाठ्यांकडून प्राप्त झाली.
इंदापूर ते पोलादपूर दुसºया टप्प्याच्या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. सर्व चाचण्या झाल्या असून, मोºयांची कामे सुरू आहेत. काही दिवसांतच भरावाचे कामदेखील सुरू होणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात मातीची गरज भासणार आहे. ठेकेदार कंपनी सोईसाठी व मोठा नफा मिळविण्यासाठी रस्त्याच्या जवळच असलेल्या डोंगरातून मातीचे उत्खनन करणार आहे.
मोठ्या प्रमाणात उत्खननामुळे परिसरातील गावे धोक्यात येणार आहेत.

दरडग्रस्त गावांमधील माती उत्खनन थांबवण्याची गरज
१महाड शहरासह तालुक्यातील सर्वच गाव अगर वाड्या डोंगराच्या कुशीत वसलेल्या आहेत. महाड तालुक्यातील डोंगर भागात कोसळणारा मुसळधार पाऊस आणि शहर तसेच परिसरात विकासकामांसाठी माती आणि दगड खडीची गरज यासाठी करण्यात आलेले मोठ्या प्रमाणात उत्खनन हा फटका महाडकरांना २००५मध्ये बसला, तेव्हापासून महसूल विभागाची आपत्कालीन यंत्रणा पावसादरम्यान गावात सावधानतेचा इशारा आणि नोटीस देत असताना पुन्हा उत्खनन हे धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.
२गावागावांत होणाºया लाखो ब्रास माती उत्खननाला आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे. चौपदरीकरण हा राजकीय प्रकल्प आहे. यासाठी मातीची गरजदेखील आहे; पण संभाव्य दरडग्रस्त गावांमध्ये अगर भूगर्भशास्त्रज्ञाने धोकादायक घोषित केलेल्या गावांमध्ये उत्खननाला परवानगी दिली जाणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे एखाद्या वेगळ्या गावात माती उत्खननाला परवानगी देऊन येथील ग्रामस्थांचे जीवन दरडीच्या छायेत येणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी स्थानिक पातळीवर तहसीलदार व प्रांताधिकाºयांवर येऊन ठेपली आहे.

५०० किंवा १००० ब्रास माती उत्खननासाठी प्रांत किंवा तहसीलदार कार्यालयाकडून परवाना (रायल्टी) देण्यात येते. मोठ्या उत्खननासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी देण्यात येते. अभिप्रायासाठी आलेल्या उत्खननाच्या परवानगीबाबत अभिप्राय देताना, या दरडग्रस्त संभाव्य धोकादायक ठिकाणांचा विचार करूनच अभिप्राय देण्यात येईल.
- चंद्रसेन पवार, तहसीलदार, महाड

शासनाला या डोंगर भागातून होणाºया मातीच्या उत्खननामुळे मोठ्या प्रमाणात महसूल मिळणार आहे. महसुलासोबत नागरिकांच्या जीवाचा विचार शासनाने करणे गरजेचे आहे. महाड तालुक्यातील अनेक गावांवर दरडीचा धोका असल्याने यापुढे मातीच्या उत्खननाचा ज्या सर्व्हे नंबरमध्ये परवाना देण्यात येईल, त्या भागाची शासनाकडून पाहणी करणे किंवा भूगर्भशास्त्रज्ञांचा अहवाल घेणे गरजेचे आहे. मात्र, सध्या तालुक्यातील कोणत्याही डोंगरात मातीच्या उत्खननाला परवानगी दिली, तर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.

झाडांच्या कत्तलीमुळे होणार मातीची धूप
डोंगर भागातील जे.सी.बी किंवा पोकलेनद्वारे होणारे मातीचे उत्खनन यामुळे खाचखळगे शिल्लक राहणार आहेत. अशा वेळी या ठिकाणी डोंगर भागातून येणारे पाणी या मातीमध्ये झिरपून डोंगर पोकळ करून दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येणार नाही. ज्या ठिकाणातून मातीचे उत्खनन केले जाणार आहे, अशा ठिकाणची झाडे नष्ट होणार आहेत. त्यामुळे पर्यावरणाला ही बाब हानिकारक ठरणार आहे. त्या ठिकाणच्या उत्खननानंतर मातीची धूपदेखील मोठ्या प्रमाणात होणार आहे. प्रत्यक्ष महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात तोडल्या जाणाºया झाडांची नोंद शासन दरबारी घेतली गेली आहे, असे असले तरी यापेक्षा किती तरी जास्त पटीने भरावासाठी उत्खनन होताना झाडांची कत्तल केली जाणार आहे. जो नियम चौपदरीकरणाच्या जागेवरील झाडांसाठी लागू करण्यात आला तोच नियम भरावाच्या मातीच्या उत्खननाच्या ठिकाणी त्या झाडांना लावला जाणार का?

महाडमधील ३१ गावांना दरडीचा धोका
२००५ मध्ये महाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या, यामध्ये शेकडो नागरिक मृत्युमुखी पडले, तर शेकडो घरे जमीनदोस्त झाली. या झालेल्या नुकसानामध्ये दासगाव, जुई, कोंडिवते आणि रोहन या चार गावांचा समावेश आहे.
तर त्याच वेळी संभावे दरडीचा धोका म्हणून सव, कुर्ला, दंडवाडी, चोचिदे, हिरकणी वाडी, आदे, करंजखोल या गावांमध्ये रहिवाशांना विस्थापित करण्याची गरज निर्माण झाली. त्यानंतर भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांच्यामार्फत संपूर्ण महाड तालुक्याचा सर्व्हे करण्यात आला.
वलंग, रोहन, खैरेतर्फे तुडील, जुई, अप्परतुडील, लोअरतुडील, कोंडिवते, चोचिंदे, वनीकांड, मुठवली, सव, अंबिवली बु., कांबळे तर्फे विन्हेरे, दासगाव करंजखोल पोटसुरेआली, कोथेरे जंगमवाडी, दाभोल व खडपवाडी दाभोल कमोहल्ला बौद्धवाडी, दाभोल ड. गावठण, गोठे बु., गोठे खु. विर, नडगाव तर्फे बिरवाडी, वरंध मोहत सुतारवाडी, दासगाव अदिवासी वाडी, कुर्ले दंडवाडी, शिंगर कोंड मोरेवाडी, रावतळमानेची धार, टोळ बु., कोतुर्डे भणगेवाडी अशा ३१ ठिकाणी दरडीचा धोका असल्याचे निष्पन्न झाले.
महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या भरावासाठी लाखो ब्रास मातीचे उत्खनन महाड तालुक्यात होणार आहे. मात्र, या भरावासाठी मोठ्या प्रमाणात उत्खनन झाले, तर संपूर्ण महाड तालुका धोक्यात येणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title:  Due to soil erosion, the risk of drowsiness should be allowed by the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड