अलिबाग : शहरातील आम आदमी पार्टीमध्ये निवडणुकीच्या तोंडावर फाटाफूट झाली आहे. शेकापला शह देण्यासाठी उघडण्यात आलेल्या महाआघाडीत सामील होण्याबाबत आपमध्ये दोन मतप्रवाह असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे या दुफळीचा फायदा शेकापला होण्याची शक्यता आहे. आपचे दिलीप जोग यांनी आघाडीत नसल्याचे स्पष्ट केले असतानाच मंगळवारी आपच्या अर्धा डझन कार्यकर्त्यांनी महाआघाडीत सामील होण्याबाबतचे पत्रक प्रसिध्द केले. त्यामुळे जोग एकाकी पडल्याचे चित्र आहे. व्यापक जनहिताच्या दृष्टीने अलिबाग नगर पालिकेच्या निवडणुकीसाठी निर्माण झालेल्या आघाडीमध्ये आप सामील असल्याचे आपचे अॅड. अजय उपाध्ये, मनोज घरत, संदीप घाडी, पी.व्ही. शिंदे, आर.आर. शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे. आघाडीमध्ये सामील होण्याचा निर्णय बहुमताने घेतला आहे. एकीकडे असे असताना जोग यांनी मात्र इन्कार केला आहे. त्यामुळे आपची फाटाफूट होऊन त्यांच्यामध्ये दोन गट निर्माण झाले असल्याचे उघड झाले आहे. (प्रतिनिधी)
निवडणुकीच्या तोंडावर ‘आप’मध्ये फाटाफूट
By admin | Updated: October 27, 2016 01:54 IST