मच्छीमारांसाठी स्वतंत्र पॅकेजची मागणी - सुनील तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 12:20 AM2020-06-13T00:20:44+5:302020-06-13T00:20:54+5:30

रोहा येथे पत्रकार परिषद : विरोधकांच्या प्रश्नांना प्रतिउत्तर; पुनर्वसनासाठी नुकसानीचा आराखडा लवकरच

Demand for separate package for fishermen - Sunil Tatkare | मच्छीमारांसाठी स्वतंत्र पॅकेजची मागणी - सुनील तटकरे

मच्छीमारांसाठी स्वतंत्र पॅकेजची मागणी - सुनील तटकरे

Next

रोहा : निसर्ग वादळाचा सर्वाधिक फटका दापोली, मंडणगड, दिवेआगर, श्रीवर्धन, म्हसळा भागात बसला. शेकडो एकर फळबागा उद्ध्वस्त झाल्या. रोहा, मुरूड, अलिबाग, पेण तालुक्यातही अतोनात नुकसान झाले. घरे, शाळा, शासकीय इमारती, हाउसिंग सोसायटींचे पत्रे उडून सामान्य कुटुंबे उघड्यावर आली. त्या सर्वांचे योग्य पुनर्वसन झाले पाहिजे. त्यासाठी नुकसानीचा आराखडा लवकरात लवकर तयार केला जाईल. दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होतील. त्यापाठोपाठ लगेचच तातडीची मदत देण्याचे काम सुरू होईल. रॉकेल, धान्यवाटप सुरू आहे. मच्छीमारांचे अतोनात नुकसान झाले. त्यांच्यासाठी मदतीची स्वतंत्र मागणी केली आहे. मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही. त्यांनी सातारा, सांगली महापुरात जेवढी मदत केली, तो जीआर समोर ठेवा. त्यापेक्षा आघाडी सरकार सरस मदत करेल, असा भाजपला चिमटा काढत खा. सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली.

खा. सुनील तटकरे यांनी निसर्ग वादळाच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर रोहा येथे शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. प्रारंभी दक्षिण रायगड अंशत: कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असल्याचे समाधान खा. तटकरे यांनी व्यक्त केले. कोरोनाच्या धर्तीवर केंद्राने जाहीर केलेली विविध मदत अद्याप महाराष्ट्रात पोहोचली नाही. त्याबाबत संसदेत केंद्र सरकारला जाब विचारू, असे खासदार तटकरे यांनी सांगितले. वादळाच्या पूर्वसंध्येला प्रशासन, सरकारने उत्तम नियोजन केले. जीवितहानी टाळता आली. तरीही प्रशासनाने काही बाबतीत दिशाभूल करण्याचे प्रयत्न केले. प्रथम रस्ते मोकळे केले. श्रीवर्धन, दिवेआगर अक्षरश: उद्ध्वस्त झाले. वादळात सर्वच तालुक्यांत मोठे नुकसान झाले. फळबागा नष्ट झाल्या, घरांचे पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले. त्या सर्व बाधितांना योग्य भरपाईसाठी आग्रही आहे. नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्र्यांपाठोपाठ खा. शरद पवार यांनी पाहणी केली. त्यांच्यासमोर वस्तुस्थिती आली. मच्छीमारांसाठी स्वतंत्र पॅकेजची मागणी केली आहे, असेही तटकरे यांनी त्या वेळी सांगितले. या वेळी आ. अनिकेत तटकरे, जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील आदी उपस्थित होते.

रायगडला केंद्र सरकार मदत का देत नाही? : जिल्ह्यातील अनेक फळबागा उद्ध्वस्त झाल्या. त्यांना जुन्या रोहयोअंतर्गत पुनर्जीवित करण्याची तत्त्वत: मान्यता मिळाली. तातडीने पंचनामे झाले पाहिजेत. सर्वच वस्तुनिष्ठ भरपाई दिली जाईल. भरपाई प्रत्येकाच्या खात्यात जमा होणार. राष्ट्रीयीकृत बँकांनी लोकांना त्रास दिले हे निषेधार्ह आहे. तसेच काही व्यापारी वाढीव दराने पत्रे, पाइप विकत असल्याचे समोर आले. त्यांच्यावरही कारवाई करण्याचे आदेश दिले. पर्यटन व्यवसायाला मोठा धक्का बसला. त्यांचे व्याज माफ करावे, अशी मागणी करणार आहे. वादळाची दखल केंद्राने घेतली, मात्र केंद्राची आपत्ती व्यावस्थापन टीम अजून आलेली नाही. अजून मदत मिळण्याचे संकेत नाहीत. रायगडला केंद्र सरकार मदत का देत नाही, हे त्यांनी आधी केंद्राला सांगावे, मग टीका करावी, असा टोला खा. सुनील तटकरे यांनी रायगडचा वादळ दौरा करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपच्या नेत्यांना लगावला.

Web Title: Demand for separate package for fishermen - Sunil Tatkare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड