कर्नाळा अभयारण्यात पक्षिप्रेमींसह पर्यटकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 10:52 PM2018-10-13T22:52:03+5:302018-10-13T23:25:17+5:30

पक्षी निरीक्षणाचा हंगाम सुरू : १३४ प्रजातींचे पक्षी; अरण्यात ६४२ प्रकारचे वृक्ष

A crowd of tourists in Karnala Wildlife Sanctuary | कर्नाळा अभयारण्यात पक्षिप्रेमींसह पर्यटकांची गर्दी

कर्नाळा अभयारण्यात पक्षिप्रेमींसह पर्यटकांची गर्दी

googlenewsNext

- नामदेव मोरे


नवी मुंबई : कर्नाळा अभयारण्यात पक्षी निरीक्षण हंगाम सुरू झाल्यामुळे पक्षी निरीक्षकांसह पर्यटकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. ४.४८ चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेल्या अभयारण्यात ६४२ प्रजातींचे वृक्ष आहेत, तर तब्बल १३४ प्रजातींचे स्थानिक व ३८ स्थलांतरित पक्षी पाहावयास मिळत आहेत.


मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलपासून १२ किलोमीटर अंतरावर कर्नाळा अभयारण्य आहे. शासनाने कर्नाळा किल्ल्याच्या परिसरातील ४.४८ चौरस किलोमीटर क्षेत्र १९६८ मध्ये पक्षी अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. ५० वर्षांमध्ये येथील वनसंपदा व पक्ष्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होऊ लागली आहे. आॅक्टोबर ते फेब्रुवारी हा पक्षी निरीक्षणासाठी योग्य कालावधी समजला जातो, यामुळे पर्यटकांची व पक्षिप्रेमींची गर्दी वाढू लागली आहे. पर्यटकांच्या सुविधेसाठी ठाणे वन्यजीव विभागाने विशेष व्यवस्था केली आहे. अभयारण्याच्या सुरुवातीलाच पक्ष्यांची माहिती कोणत्या परिसरात कोणते पक्षी सापडतील, याची माहिती देणारे फलक लावले आहेत.


निरीक्षणासाठी रेस्ट हाउस समोर, गोल प्लॅटफॉर्म, हरियाली ट्रेल, मोरटाका ट्रेल, हरियाली ट्रेल मध्यभाग, बर्ड वाचर्स पॉइंट, कर्नाळा किल्ला अशी सात ठिकाणे निवडली आहेत. पक्षिप्रेमींना वनविभागाचे अधिकारी व संयुक्त वनसमितीमध्ये काम करणारे, स्थानिक, गावांमधील कर्मचारी अभयारण्याची व पक्ष्यांचीही माहिती देत आहेत. राज्यातील प्रमुख पक्षी अभयारण्य म्हणून कर्नाळाची ओळख निर्माण झाली असून, ती टिकविण्यासाठी वनविभागाने विविध सुविधा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला प्रसाधनगृह, गेस्टहाउस, पर्यटकांसाठी चेंजिंग रूम, बचतगटाच्या माध्यमातून जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

पर्यटनासाठी योग्य वेळ
कर्नाळा अभयारण्यामध्ये पक्षी निरीक्षणासाठी आॅक्टोबर ते फेब्रुवारी ही योग्य वेळ आहे. सद्यस्थितीमध्ये वातावरण चांगले आहे. संपूर्ण परिसरात हिरवळ पसरली असून, पक्षी निरीक्षणासाठी व पर्यटनासाठीही हीच योग्य वेळ असल्याची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे.


प्राण्यांची संख्याही वाढली : अभयारण्यात प्राण्यांची संख्याही वाढू लागली आहे. रानमांजर, ससा, भेकर, रानडुक्कर, साळिंदर, खार, वानर, माकड व इतर प्राणीही अभयारण्यात मोठ्या प्रमाणात आहेत.

 

अभयारण्यास भेट देण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. पर्यटकांच्या व पक्षी निरीक्षकांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पर्यटक कुटी, बटरफ्लाय गार्डन, निरीक्षणासाठी रानवाटा तयार केल्या आहेत.
-प्रदीप चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी

 

अभयारण्यात महामार्गाकडून पूर्वेकडे हरियल व मोरटाक या दोन महत्त्वाच्या निसर्गवाटा आहेत. अनुभवी पक्षी निरीक्षकांना या वाटांवर एका भेटीत ४७ पेक्षा जास्त पक्षी पाहता येतात. महामार्गाच्या पश्चिमेला गारमाळ ही अजून एक निसर्गवाट अस्तित्वात आहे.

  • अभयारण्यात सापडणारे पक्षी : शिपाई बुलबुल, लालबुड्या बुलबुल, टकाचोर, राखी कपाळाची हारोळी, नारंगी डोक्याचा कस्तूर, टिकेलचा निळा माशीमार, बाकचोच सातभाई, निलगिरी रानपारवा, पाचू होला, निलांग माशीमार, लाल छातीचा माशीमार, राखी डोक्याची पिवळी माशीमार, कोकीळ, रान धोबी, पांढºया गालाचा कुटुरगा, कोतवाल, जाड चोचीचा फुलटोच्या, टोई पोपट, राखी कोतवाल, वेडा राघू, चष्मेवाला, करडा धोबी, भांगपाडी मैना, दयाळ, टिटवी, हुदहुद, ठिपकेवाला पिंगळा, पांढºया भुवईचा धोबी, पट्टेदार कोकीळ, शिक्रा, मलबार शिळ कस्तूर, जांभळा शिंजीर, तांबट छोटा सोनपाठी सुतार, तिबोटी धिवर, सामान्य धिवर, शिंपी, शामा, सामान्य खरुची, तुरेवाला सर्पगरुड, पिंगट पोटाचा सातभाई, जंगली मैना, पांढºया छातीचा धिवर, पिवळी रामगंगा, नील कस्तूर, भारतीय नील दयाळ, राखी वटवट्या, चिमण चंडोल, काळटोप कस्तूर, सुभग, डोमकावळा, भारतीय राखी धनेश, तांबूस सुतार, ठिपकेवाला सातभाई, पांढऱ्या ठिपक्यांची नाचण.

Web Title: A crowd of tourists in Karnala Wildlife Sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.