न्यायालयाने हरकती फेटाळल्या
By Admin | Updated: November 16, 2016 05:40 IST2016-11-16T05:40:22+5:302016-11-16T05:40:22+5:30
काँग्रेस आणि भाजपाने शेकापच्या नगराध्यक्ष, नगरसेवक पदाच्या उमेदवाराविरोधात दाखल केलेली हरकत न्यायालयाने मंगळवारी फेटाळून

न्यायालयाने हरकती फेटाळल्या
अलिबाग : काँग्रेस आणि भाजपाने शेकापच्या नगराध्यक्ष, नगरसेवक पदाच्या उमेदवाराविरोधात दाखल केलेली हरकत न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली. त्यामुळे शेकापच्या गोटात प्रचंड आनंदाचे वातावरण होते, तर काँग्रेस आणि भाजपाचे पदाधिकारी कमालीचे अस्वस्थ असल्याचे दिसून आले. न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता अलिबाग नगर पालिकेच्या निवडणुकीत प्रचाराला चांगलाच वेग येणार आहे.
शेकापचे प्रशांत नाईक हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, तर अनिल चोपडा हे प्रभाग ७ मधील नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत. दोन्ही उमेदवार ठेकेदार असल्याबाबत काँग्रेस आणि भाजपाने उमेदवारी अर्ज छाननीच्या वेळी आक्षेप घेतला होता. यावर निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव बनसोडे यांनी शेकापच्या बाजूने निर्णय दिला होता. या विरोधात काँग्रेस आणि भाजपाने जिल्हा न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. सोमवारी निर्णय अपेक्षित होता मात्र, न्यायालयाने तो स्थगित ठेवला होता.
दरम्यान, जिल्हा न्यायालयात अपेक्षित निकाल न लागल्याने, उच्च न्यायालयामध्ये निवडणूक याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे भाजपाचे अॅड. महेश मोहिते यांनी सांगितले. निकाल अपेक्षित होता, सत्याचा नेहमीच विजय होतो, असे शेकापचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रशांत नाईक यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)