Bharat Gogawale on Sunil Tatkare: रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष वाढतच चालला आहे. महायुतीकडून पालकमंत्रिपदासाठी आदिती तटकरे यांची निवड करण्यात आली होती. मात्र आदिती तटकरेंच्या निवडीला शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी विरोध दर्शवला. पालकमंत्रीपदावरून मंत्री भरत गोगावले यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. गोगावले समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त रास्ता रोकोही केला. त्यानंतर भरत गोगावले यांनी आक्रमक भूमिका घेत राजीनामा देतो, असं वक्तव्य केले. त्यानंतर आता मंत्री भरत गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर मोठा आरोप केला आहे.
पालकमंत्री पदांची यादी जाहीर केल्यानंतर दोन जिल्ह्यांसाठी नियुक्त केलेल्या मंत्र्यांची नावे मागे घेण्याची नामुष्की सरकारवर ओढावली होती. यादी जाहीर होताच दुसऱ्याच दिवशी नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या नावाला स्थगिती देण्यात आली. पालकमंत्रिपदासाठी आदिती तटकरे यांची निवड झाल्याने मंत्री भरत गोगावले यांनी विरोध दर्शवला होता. दुसरीकडे, रायगडमधील शिवसेनेच्या आमदारांनी सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांच्याविषयी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे आता रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने सामने आले आहेत.
अशातच मंत्री भरत गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुनील तटकरे यांनी आम्हाला पाडण्यासाठी वेगवेगळ्या लोकांसोबत सेटलमेंट केली होती असा आरोप भरत गोगावले यांनी केलाय. पालकमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याने सुनील तटकरेंनी आम्ही नको होतो असंही भरत गोगावले यांनी म्हटलं.
"महेंद्र थोरवे आणि माझ्यासाठी सगळ्यांनी मनापासून काम केले. त्यांनी दाखवावं की, आम्ही कुठल्या कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला किंवा मतदाराला काही चुकीचं सांगितले. आमदारकीच्या निवडणुकीत त्यांनी जे काही वाईट कृत्य केलं तेच आम्ही बोलतोय. तुम्हाला ते कळणं गरजेचं आहे. भरत गोगावले का नको तर ते पालकमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. तिथे दळवींना पाडण्यासाठी सेटलमेंट केली. मी निवडून आलो तर पालकमंत्रपदासाठी दावा करेल म्हणून आमच्यासाठीही सेटलमेंट केली," असं भरत गोगावले म्हणाले.