रोहा : तालुक्यातील धाटाव औद्योगिक परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून सायंकाळी व पहाटेच्या वेळी पावसाळी धुक्याचा फायदा घेत काही कारखानदार हवेत विषारी वायू सोडून परिसर प्रदूषित करीत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वायू प्रदूषणामुळे अनेक गावांमध्ये धुके पसरल्यासारखे दिसत आहे. यामुळे निवी पंचक्रोशीतील गावांना याचा त्रास होत असून अनेक ग्रामस्थांना याची बाधा झाल्याचे निदर्शनास आले आहे. या अनुषंगाने रोहा तालुक्याचे प्रांताधिकारी सुभाष भागडे यांनी संबंधित दोषी कंपन्यांना नोटीस बजावून सक्त कारवाईचे संकेत दिले आहेत. धाटाव येथील एमआयडीसीत प्रदूषण करणाऱ्या काही कंपन्या पावसाळी वातावरणाच्या संधीचा फायदा घेत सायंकाळी व पहाटे हवेत विषारी वायू सोडून परिसर प्रदूषित करीत आहेत. या प्रदूषणाचा फटका तळाघर, वाशी, लांढर, भुवनेश्वर, बरसे, निवी या गावांना बसला. परिसरातील अनेक ग्रामस्थ भयभीत झाल्याचे पाहावयास मिळाले. या प्रदूषणामुळे ग्रामीण भागातील लोकांना दम लागणे, डोळे चुरचुरणे, अंगाला खाज येणे अशा प्रकारच्या व्याधी होत आहेत. संबंधित विभागाने या कारखानदारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
रासायनिक वायू प्रदूषण
By admin | Updated: July 31, 2015 22:59 IST