शेकापसमोर बालेकिल्ला टिकवण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 12:43 AM2019-09-02T00:43:54+5:302019-09-02T00:43:54+5:30

ग्रामीण मतदारांचा कौल महत्त्वाचा : भाजप, शिवसेनेला करावी लागणार कसरत

Challenge of sustaining a bale | शेकापसमोर बालेकिल्ला टिकवण्याचे आव्हान

शेकापसमोर बालेकिल्ला टिकवण्याचे आव्हान

Next

पेण : पेण विधानसभा (१९१) मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीतील उमेदवार या वेळीही इच्छुक आहेत. यात शेकापचे विद्यमान आमदार धैर्यशील पाटील, काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले माजी मंत्री रवि पाटील, शिवसेनेचे किशोर जैन, वंचित आघाडी व काँग्रेस अशा उमेदवारांकडून आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करण्याचे मनसुबे ठरलेले आहेत.

भाजप, शिवसेनेच्या महायुतीविरुद्ध शेकाप, राष्ट्रवादी आघाडी अशी तुल्यबळ लढत पेण विधानसभा मतदारसंघात दृष्टीक्षेपात आहे. भाजप, शिवसेना युती न झाल्यास दोन्ही पक्ष स्वतंत्र लढल्यास याचा थेट लाभ शेकापला होण्याची शक्यता असून विद्यमान धैर्यशील पाटील यांच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे. पेण विधानसभा मतदारसंघावर शेकापने १९९० पासून २००४ असे पाच वेळा प्रतिनिधित्व केले. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत शेकापचा पराभव करून माजी मंत्री रवि पाटील विजयी झाले होते. त्यानंतर २००९ ते २०१९ अशा दोन वेळा पुन्हा शेकापने मतदारसंघावरराजकीय वर्चस्व कायम ठेवले आहे.

आगामी निवडणुकीत शिवसेना, भाजपच्या राजकीय आव्हानाचा सामना करण्यास शेकापने मोर्चेबांधणी केली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस व शेकाप अशी तिरंगी लढत झाली होती. त्यामध्ये शेकापचे धैर्यशील पाटील यांना ६४,६१६ मते, काँग्रेसचे माजी मंत्री रवी पाटील यांना ६०,४९४ मते मिळून दुसऱ्या स्थानी राहिले. तर शिवसेनेचे किशोर जैन यांना ४४,२५७ मते मिळून तिसºया स्थानी त्यांनी झेप घेतली होती. यानंतर झालेल्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शेकाप काँग्रेस व शिवसेनेचे ज्या ठिकाणी आपापले उमेदवार उभे केले होते, त्यांनी जिंकून आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. मात्र, त्यानंतर झालेल्या जिल्हापरिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत शेकापने या विधानसभा मतदारसंघातील दहापैकी सहा जिल्हापरिषद मतदारसंघावर आपले राजकीय वर्चस्व सिद्ध करीत आपली ताकद विरोधकांना दाखवून दिली. दुसरीकडे पेण नगरपरिषदेत झालेल्या निवडणुकीत माजी मंत्री रवी पाटील यांच्या स्नुषा थेट नगराध्यक्ष निवडणुकीत विजयी झाल्या. रवि पाटील गटाचे ११ नगरसेवक तर पेण शहर विकास आघाडीचे दहा नगरसेवक निवडून आले. नगराध्यक्षपदासाठी प्रीतम ललित पाटील यांना १२,२०० मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार संतोश श्रुंगारपुरे यांना १०,००० मते मिळाली. पेण नगरपरिषदेत त्या वेळेच्या निवडणुकीत हा राजकीय संघर्ष २२०० मतांच्या आघाडीपुरता सीमित राहिला होता. बदलत्या राजकीय प्रवाहात केंद्रात भाजपचे सरकार प्रचंड बहुमताने स्थापित झाल्याने मतदारसंघातील राजकारणही बदलले. या संधीचा फायदा घेत व भविष्यातील राजकीय वाटचाल ओळखून रवी पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश करून राजकीय विश्लेषकांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे या मतदारसंघात भाजपमध्ये उत्साह संचारला. याचा प्रभाव २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दिसून आला. पेण मतदारसंघात त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला ८९ हजारांच्या वर मताधिक्य घेऊन भाजप, शिवसेना युतीला भरघोस मतांची पेण विधानसभा मतदारसंघात विजयी आघाडी मिळवून दिली. त्या आघाडीमुळे पक्षसंघटनेत चैतन्य संचारले असून भाजप, शिवसेना महायुतीचे आव्हान शेकापच्या धैर्यशील पाटील यांच्या समोर उभे ठाकलेले आहे.
वडखळ पंचायत समिती गणाच्या पोटनिवडणुकीत शेकापने काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेत भाजपचे उमेदवार प्रथमेश जांभळे यांचा ७२ मतांनी पराभव करून काँग्रेसचे प्रदीप म्हात्रे यांना विजयी केले. राजकीय समीकरणे प्रसंगानुसार बदलण्याची क्षमता शेकापमध्ये असल्याने पेण विधानसभा मतदारसंघात ग्रामीण भागात जिल्हापरिषद व पंचायत समिती गणात शेकापची असलेली संघटनात्मक ताकद आजपर्यंत विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना व भाजप पक्षाला मोडता आलेली नाही.

मतदारसंघातील श्रेयवादाचे राजकारण
पेण विधानसभा मतदारसंघात वाशी, शिर्की, मसद, खारेपाटासाठी पाणीपुरवठा योजनेसाठी आलेला ३८ कोटी रुपयांचा विकासनिधी बाबत शेकाप, भाजप व शिवसेना या तिन्ही पक्षांत श्रेयवादाचे राजकारण सुरू आहे. मात्र, हा राजकीय कलगीतुरा आगामी निवडणुकीतच चांगलाच चर्चेला येणार आहे. हे राजकीय मुद्दे प्रचारात प्रभावी ठरणार असून वाशी, वडखळ, खारेपाटात पिण्याच्या पाण्याची टंचाई, हेटवणे, शहापाडा ते खारेपाट पाणी पुरवठा योजनेला झालेला विलंब हे मुद्दे राजकीय रणागणांवर प्रभावी ठरणार आहेत. शेकापला जमेची बाजू म्हणजे पेण तालुक्यात दादर, जिते, वडखळ, काराव, पाबळ या जिल्हापरिषद मतदारसंघावर शेकापचे पाचही सदस्य आहेत. तर सुधागडमध्ये पाली असे सहा जिल्हापरिषद मतदारसंघ शेकापच्या ताब्यात आहेत. त्यांचा मित्रपक्ष असलेला आघाडीतील राष्ट्रवादीकडे आंबेवाडी व भातसई जिल्हापरिषद मतदारसंघ आहेत. दहापैकी आठ जिल्हापरिषद मतदारसंघात शेकाप, राष्ट्रवादी आघाडीची राजकीय ताकद आहे. शिवसेनेकडे नागोठणे, जांभुळपाडा असे दोन जिल्हापरिषद मतदारसंघ आहेत. भाजपला नव्याने ताकद निर्माण करावी लागेल. मात्र, रवि पाटील भाजपमध्ये दाखल झाल्याने काँग्रेसच्या तंबूतील बरेच शिलेदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

युवा मतदारांचा कौल
पेण विधानसभा मतदारसंघात युवा मतदाराची संख्या मोठी आहे. युवा मतदार प्रामुख्याने भाजप, शिवसेना पक्षाच्या राजकीय वलयाकडे आकर्षित होत आहे. शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे तर भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लोकप्रियतेकडे युवा मतदार आकर्षित होत असून शिवसेना, भाजपसाठी या युवामतदारांचा कौल आगामी निवडणुकीत प्लसपॉइंट ठरणार आहे. आमदार धैर्यशील पाटील यांना त्यांच्याशी लढत देणारा उमेदवार भाजपचा की सेनेचा, हे चित्र युतीचे जागावाटप झाल्यानंतर स्पष्ट होईल. मात्र, धैर्यशील पाटील यांना माजी मंत्री रवि पाटील हेच प्रतिस्पर्धी म्हणून खºया अर्थाने चुरशीची लढत देतील, असे मतदारासंह राजकीय विश्लेषकांचे अनुमान आहे.

आगामी निवडणुकीत भाजप, शिवसेना महायुतीच्या उमेदवाराचा राजकीय सामना करण्याची रणनीती त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने आखलेली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला ८९ हजार तर आघाडीच्या उमेदवाराला ८८ हजार मते मिळाली होती.

रायगड जिल्ह्याच्या दृष्टीने विचार केल्यास राजकीय ताकदीत शेकाप आमदार जयंत पाटील व राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी जिल्ह्यावर राजकीय पकड ठेवलेली आहे. मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी चांगली राजकीय मशागत करून पक्षाला उभारी दिली आहे. विशेष करून पेण, अलिबाग, श्रीवर्धन आणि कर्जत या शेकाप, राष्ट्रवादी आघाडीच्या ताब्यात असलेल्या विधानसभा मतदारसंघावर विशेष करून लक्ष केंद्रित करून भाजपला नवी दिशा दिली आहे.

Web Title: Challenge of sustaining a bale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.