महाड : रायगड प्राधिकरणाची किल्ले रायगड परिसराची विकासात्मक कामे चालू आहेत. त्याच धर्तीवर राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा वाडा हा जुन्या पद्धतीने बांधून त्याचे संवर्धन करण्यात येईल, असे आश्वासन रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकासमंत्री भरत गोगावले यांनी दिले. राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा जन्मोत्सव सोहळा पाचाड येथील समाधिस्थळी आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.
रायगड जिल्हा परिषद आणि पाचाड ग्रामपंचायत यांनी हा सोहळा आयोजित केला होता. ढोलताशा व लेझीम पथकामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली होती. गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत माँसाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन, अभिषेक व महाआरती करण्यात आली. याप्रसंगी पंचायत समिती महाड गटविकास अधिकारी डॉ. स्मिता पाटील, पाचाड सरपंच सीमा बेंदुगडे, स्वराज्य संग्राम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे, बाळ राऊळ, बंधू तरडे, सुरेश महाडिक, आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्रिपदाचा तिढा लवकर सुटेलराज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. मात्र, पालकमंत्री जाहीर केले नाहीत. रायगडच्या पालकमंत्रिपदावर राष्ट्रवादी व शिवसेना या दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. याबाबत भरत गोगावले यांनी भाष्य केले. ते म्हणाले, पालकमंत्री पदाबाबत कोणताही तिढा नाही. राजमाता जिजाऊ समाधी, किल्ले रायगड या छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावनस्थळी येऊन आशीर्वाद घेतले आहेत. त्यामुळे लवकरच रायगडला पालकमंत्रिपद मिळेल.