उरण परिसरातील रस्त्यांची झाली दुरवस्था; खड्ड्यांमुळे चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 11:36 PM2020-07-22T23:36:52+5:302020-07-22T23:37:10+5:30

वाहनचालकांची कसरत; अपघाताची शक्यता, संबंधित विभागाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष

Bad condition of roads in Uran area; Sieve due to pits | उरण परिसरातील रस्त्यांची झाली दुरवस्था; खड्ड्यांमुळे चाळण

उरण परिसरातील रस्त्यांची झाली दुरवस्था; खड्ड्यांमुळे चाळण

googlenewsNext

उरण : तालुक्यातील विविध विभागांच्या अखत्यारित असलेल्या काही रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे रस्त्यातून प्रवास करणे वाहनचालकांसाठी दिवसेंदिवस कठीण होऊन बसले आहे. उरण परिसरातील सिडको, सार्वजनिक बांधकाम विभाग, रायगड जिल्हा परिषद, जेएनपीटी, ओएनजीसी आदी विभागांच्या अखत्यारित काही रस्ते आहेत. पावसामुळे आणि संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे परिसरातील काही रस्त्यांची अक्षरशा चाळण झाली आहे.

सिडकोच्या द्रोणागिरी नोड परिसरातील काही रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, तर रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेल्या नवघर फाटा ते नवघर गाव, खोपटा गाव परिसरातील अनेक अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या उरण रेल्वे फाटा ते राघोबा मंदिर कोटगाव ११० मीटर लांबीचा रस्ता, केगाव रस्ता, जासई ते न्हावादरम्यान मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांत पाणी साचत असल्याने, रस्ता कुठला आणि खड्डा कुठला, यांचा अंदाज वाहनचालकांनाही येत नाही. यामुळे या रस्त्यावरून रात्री-अपरात्री मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना अपघाताची भीती वाटू लागली आहे.

ओएनजीसीच्या अखत्यारित असलेल्या बोकडवीरा फाटा ते उरण ओएनजीसी प्रकल्पादरम्यानच्या रस्त्यावरही मोठमोठे खड्डे पडले आहेत. चारफाटा येथील रस्त्याला तर पावसात तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. जेएनपीटी परिसरातील काही रस्तेही खड्ड्यांनी भरलेले आहेत. या खड्डेमय रस्त्यातून प्रवास करताना वाहनचालकांची कसरत होत आहे.

जासई ते न्हावादरम्यान मोठमोठे खड्डे

उरण रेल्वे फाटा ते राघोबा मंदिर कोटगाव रस्ता, जासई ते न्हावादरम्यान मोठमोठे खड्डे पडले असल्याची कबुली उरण सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सी.आर.बांगर यांनी दिली. या रस्त्यांची दुरुस्ती करण्याचा प्रस्तावही मंजूर केला आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्ते दुरुस्तीसाठी निधी खर्च करण्यास परवानगी नाही. यामुळे किमान कोविडमध्ये तरी रस्ते दुरुस्ती शक्य नसल्याचे बांगर यांनी स्पष्ट केले. इतर शासकीय विभागांचीही अशीच अवस्था झाली आहे.

Web Title: Bad condition of roads in Uran area; Sieve due to pits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.