Around 8 lakhs of ammunition in cash | रोह्यातील भाटे वाचनालयात साडेआठ लाखांचा अपहार
रोह्यातील भाटे वाचनालयात साडेआठ लाखांचा अपहार

रोहा : रोह्याच्या भाटे सार्वजनिक वाचनालयात अपहार झाल्याचे समोर आल्यानंतर नागरिकांच्या रेट्यामुळे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. या संस्थेचे आॅडिट रिपोर्ट हाती आल्यानंतर रोहा अष्टमी सिटीझन्स फोरमने बुधवारी बैठक बोलावली होती. यावेळी रोहा भाटे वाचनालयात ८ लाख ४३ हजार ८११ रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले. हा सर्व घटनाक्रम पाहता हा अपहार संगनमताने झाल्याचा संशय व्यक्त होत असल्याने सिटीझन्स फोरमच्या वतीने पोलिसांत वेगळी तक्रार देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.
सप्टेंबर२०१८ पासून या संस्थेत आर्थिक गैरव्यवहार आणि अफरातफर सुरू होती. संचालक मंडळाने या कालावधीत संबंधितांच्याविरोधात कोणतीही कायदेशीर कारवाई केली नव्हती. गावातील नागरिकांनी याविरोधात आवाज उठवीत संचालक मंडळास धारेवर धरल्याने अखेर याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याबाबतचे आॅडिट रिपोर्ट आल्यानंतर बुधवारी शासकीय विश्रामगृह येथे रोहा अष्टमी सिटीझन्स फोरमची बैठक निमंत्रक आप्पा तथा प्रदीप देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यामध्ये भाटे वाचनालयाचे करण्यात आलेले आॅडिट रिपोर्ट पदाधिकारी यांनी पोलिसांत अद्याप दिलेले नाही, ते देणे. वाचनालयातील विविध घटनाक्रम पाहता, हा सर्व गैरव्यवहार संशयास्पद तसेच संगनमताने झाले असल्याचे दिसून येत असल्याने फोरमच्यावतीने पोलिसांकडे वेगळी तक्रार देणे. वाचनालयातून तसेच जिल्हा सहकारी संस्था निबंधक यांच्याकडून विविध कागदपत्रे मिळविणे. मागील तीन वर्षांत हॉल वापरासाठी दिलेल्या तारखा आणि संस्थेला भाड्यापोटी आलेल्या रकमांचे तपशील मागवून घेणे, त्याची तपासणी करणे. काही स्वार्थी प्रवृत्तींनी वाचनालयात आपली संस्थाने थाटण्यासाठी त्यांना अडचणीचे ठरणाऱ्या शेकडो वाचकांचे वार्षिक तसेच आजीवन सभासदत्व रद्द केले होते. या संस्थेतील सर्व गैरप्रकार पाहता अनेक रोहेकर तसेच वाचक येथे सभासद होण्यास निरुत्साही दिसून येत. तरी सर्व भूतपूर्व सभासदांची माहिती घेऊन, त्यांनी भाटे वाचनालयात पुन्हा सक्रिय व्हावे, त्याचबरोबर आपल्या तालुक्यातील तरुण तसेच नवोदित वाचकांनी सभासद व्हावेत, यासाठी संपर्क जाहीर आवाहन करणे आदी महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत निर्णय घेण्यात आले. या बैठकीस श्रीनिवास वडके, नितीन परब, संजय कोनकर, श्रीकांत ओक, दिलीप वडके, महेश सरदार, विजय देसाई, राजेंद्र जाधव, सतीश साठे, विनोद पटेल, सागर जैन आदींसह नागरिक उपस्थित होते.


Web Title: Around 8 lakhs of ammunition in cash
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.