खालापूर : खाजगीकरणातून तयार करण्यात आलेल्या खोपोली-पेण रस्त्याची पावसाने दैना केली आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. शासनाने या रस्त्यावरील टोल बंद केल्याने रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. खड्ड्यामुळे परिसरातील अपघात वाढले असून अनेकजण जखमी झाले आहेत. खोपोली-पेण रस्त्याची दुरवस्था झाली असून रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. २७ किमीचा हा रस्ता बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर बांधण्यात आला होता. रस्त्याच्या दुरुस्ती व देखभालीची जबाबदारी जे. एम. म्हात्रे एन्फ्राप्रोजेक्ट या कंपनीकडे होती. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनांकडून टोल आकारणीचे कामही याच कंपनीकडे होते. मात्र शासनाने टोल नाका बंद केल्याने म्हात्रे कंपनीकडून हा रस्ता बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे असून या रस्त्यावरील प्रवास धोकादायक झाला आहे.टोल सुरू असताना या रस्त्याची दुरुस्ती वेळेवर होत होती. मात्र टोल बंद झाल्यानंतर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. खड्ड्यामुळे दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले असून अनेजण जखमी झाल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे भरले जात नसल्याने अपघाताची भीती निर्माण झाली होती. रात्री दुचाकीस्वारांना अनेक अपघातही झाले आहेत. त्यामुळे वावोशी परिसरातील स्थानिकांनी पुढे येत रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्याचे काम शुक्र वारी केले. संदेश पाटील, तानाजी जाधव, पंकज देशमुख, विश्वास पाटील, संदीप फराट, विकास बलकवडे व अन्य तरुणांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यांना यशवंत साबळे, मनोजसिंग ठाकूर, आनंद चव्हाण व अन्य लोकांनी खडी, ग्रीट व यंत्रसामग्री देऊन मदत केली. यावेळी तांबाटी ग्रामपंचायत सदस्य शरद कदम यांनी या तरु णांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी नीलेश थोरवे, शशी मोरे, मंगेश कदम हे देखील उपस्थित होते.
खड्ड्यांमुळे अपघातांत वाढ
By admin | Updated: August 1, 2015 23:34 IST