निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, आतिबाग - सध्या सोशल मीडियावर बऱ्याच घडामोडी घडत असतात. अफवा पसरवल्या जातात. चुकीचे संदेश पाठवले जातात. त्यामुळे सामाजिक वातावरण बिघडले आहे. सामाजिक वातावरण तंदुरुस्त ठेवण्यासाठी कोकण परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांमध्ये अत्याधुनिक सोशल मीडिया लॅब उभारण्यात येणार असल्याचे कोकण परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे सांगितले.
कोकण परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे परिक्षणासाठी रायगड जिल्ह्याच्याच्या दौऱ्यावर आले होते. शुक्रवारी अलिबाग येथील रायगड पोलीस मुख्यालय, पोलीस अधिक्षक कार्यालयाचे परिक्षण केले. त्यावेळी ते पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारत होते. रायगड पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, रायगड पोलिस अपर पोलीस अधिक्षक अभिजीत शिवथरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यावेळी उपस्थित होते.
सध्या सोशल मीडियावर पोस्टमुळे सामाजिक वातावरण बिघडले. यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस ठाण्यांमध्ये सोशल मीडिया कक्ष सुरु करण्यात आले. परंतु सोशल मीडिया लॅब नाहीत. त्यामुळे कोकण परीक्षेत्रातील, पालघर, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हयांमध्ये अत्याधुनिक सोशालमिडिया लॅब सुरु करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. रायगड जिल्हयात सोशलमिडिया लॅब सुरु करण्यासाठी नियोजन विभागाने २० लाख रुपये मंजूर केले आहेत, अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांनी यावेळी दिली.
रायगड जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. पर्यटन व्यवसायातून रोजगार निर्मिती होते. परंतु या व्यवसायाच्या आडून जर कुणी आनैतिक धंदे करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करणार . हॉटेल , लॉजमध्ये अनैतिक धंदे करणात्यांवर पोलीसांची नजर असेल. त्याचप्रमाणे अमली पदार्थांची विक्री करणाऱ्याविरुध्छ कारवाई केली जाईल. यापूर्वी अशा कारवाया रायगड पोलिसांनी केल्या आहेत, अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली. कोकणातील पाचही जिल्हयांना सागरी किनारा आहे. सागरी सुरक्षा राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची आहे. त्यामुळे कोकणातील सागरी सुरक्षा अधिक बळट करण्यावर भर दिला जात आहे. त्यादृष्टीने सागरी पोलिस ठाने सुरु करण्यात आली आहेत. समुद्र किनाऱ्यांवर गस्त वाढविण्यात येणार आहे. समुद्रात होणाऱ्या इंधन तस्करीवर देखील आमची नजर आहे. इंधन तस्करी करणऱ्यावर कारवाई देखील करण्यात आली आहे, असे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांनी सांगितले.