उरण : शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्मा स्मारकांची दुरवस्था झाली आहे. स्मारकांच्या रंगरंगोटी आणि दुरुस्तीसाठी शासनाने ९८ लाख रुपये मंजूर केले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अनिल करपे यांनी दिली. शिवसेनेचे आमदार मनोहर भोईर यांनी राज्यातील हुतात्मा स्मारकांच्या झालेल्या दुरवस्थेची बाब सभागृहात निदर्शनात आणून दिल्यानंतर राज्यातील २०४ हुतात्मा स्मारकांची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.स्वातंत्र्य संग्रामात सविनय कायदेभंग आंदोलनांतर्गत देशभरात आंदोलने सुरू होती. ‘इंग्रज भारत छोडो’चा नारा देत देशभरात आंदोलनाचा भडका उडाला होता. त्याच वेळी चिरनेर येथेही २५ सप्टेंबर १९३० साली ‘जंंगल सत्याग्रह’ आंदोलन सुरू करण्यात आले होते. शांततामयरीतीने सुरू असलेल्या जंगल सत्याग्रहात हजारो आंदोलक सहभागी झाले होते. या वेळी ब्रिटिश पोलिसांनी निर्दयपणे केलेल्या बेछूट गोळीबारात आठ हुतात्मे धारातीर्थी पडले, तर अनेक जण जखमी झाले.लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या धाकू गवत्या फोफेरकर, नवश्या महादेव कातकरी (चिरनेर), रामा बामा कोळी (मोठी जुई), हसुराम बुधाजी घरत (खोपटे), रघुनाथ मोरेश्वर न्हावी (कोप्रोली), परशुराम रामा पाटील (पाणदिवे), आनंदा माया पाटील (धाकटी जुई), आलू बेमट्या म्हात्रे (दिघोडे) या उरण तालुक्यातील आठ हुतात्म्यांची स्मारके शासनाने परिसरात उभारली आहेत. स्वातंत्र्य संग्रामातील या महत्त्वाच्या लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे आणि स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्याचे सर्वांनाच स्मरण व्हावे आणि हुतात्म्यांच्या स्मृती कायम तेवत राहाव्या यासाठी उरण परिसरात हुतात्म्यांच्या मूळगावी शासनाने स्मारके उभारली आहेत. मात्र, बहुतांश स्मारकांची अवस्था पार दयनीय झाली आहे. अनेक हुतात्मा स्मारकांच्या छतांचे सिमेंटचे पत्रे फुटले आहेत. त्यामुळे पावसाच्या पाण्याने छताला गळती लागते. स्मारकात पाणी साचून दुर्गंधी पसरते. शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे स्मारकांचा वापर मुतारी, शौचालय, कपडे, मासळी सुकविण्यासाठी आणि शेतीची अवजारे ठेवण्यासाठी होऊ लागला आहे.
हुतात्मा स्मारकांच्या सुशोभीकरणासाठी ८९ लाखांचा निधी, सेनेचे आमदार मनोहर भोईर यांच्या प्रयत्नांना अखेर यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 02:21 IST