विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : जिल्ह्यातील आदिवासी कबड्डीपटूंना प्रोत्साहन देवून, त्यांना खेळाडू म्हणून नावारूपास आणून समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याच्या हेतूने गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील आदिवासी कबड्डी स्पर्धेचे आयोजिन महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन असे दुहेरी औचित्य साधून राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लि. थळ कारखान्याच्या वतीने करण्यात येते. यंदा या कबड्डी स्पर्धेत जिल्ह्यातील ६४ आदिवासी कबड्डी संघांनी विक्रमी सहभाग दिला. अंतिम विजेतेपदाचा मानकरी गावदेवी तळेवाडी संघ ठरला.आरसीएफ थळ कारखान्याच्या वतीने या आदिवासी कबड्डी स्पर्धेचे आयोजन आरसीएफ क्र ीडा संकुलाच्या पटांगणावर करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन आरसीएफचे मुख्य महाव्यवस्थापक एस.के. दास यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी उपमहाव्यवस्थापक दीपक चौधरी, विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी आणि कबड्डीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरसीएफचे मुख्य महाव्यवस्थापक एस.के.दास यांनी सर्व कबड्डीपटूंना शुभेच्छा देवून स्पर्धा यशस्वी करण्याचे आवाहन केले.स्पर्धेत गावदेवी तळेवाडी(रोहा) या संघाने प्रथम क्र मांक तर श्रीकृष्ण भोमोली या संघाने दुसरा क्र मांक पटकाविला. तृतीय क्र मांक गारभाट (अलिबाग) व चतुर्थ क्र मांक जय हनुमान मधलीवाडी-पेण या संघांनी पटकावला. स्पर्धेतील उत्कृष्ट पकड पारितोषिक अनंता आवटी (भोमोली), उत्कृष्ट चढाई पारितोषिक दयानंद नाईक (मधलीवाडी-पेण) यांनी पटकावले तर उत्कृष्ट खेळाडू म्हणून दिनकर उघडा (तळेवाडी, रोहा) यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण आर.सी.एफ.चे उपमहाव्यवस्थापक दीपक चौधरी व वरिष्ठ व्यवस्थापक सी.व्ही. तळेगावकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
आदिवासी कबड्डी स्पर्धेत ६४ संघ
By admin | Updated: May 9, 2017 01:24 IST