खोडद : जागतिक दर्जाचा रेडिओ दुर्बिण प्रकल्प म्हणून ख्याती पावलेल्या जुन्नर तालुक्यातील खोडद येथील जीएमआरटी प्रकल्पात दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील जागतिक विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. पण यावर्षीचे हे विज्ञान प्रदर्शन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन आयोजित करण्याचा निर्णय जीएमआरटी प्रशासनाने घेतला आहे. २८ फेब्रुवारी रोजी हे ऑनलाईन विज्ञान प्रदर्शन फेसबुक व युट्युबच्या माध्यमातून लाईव्ह दाखविले जाणार आहेत, अशी माहिती एनसीआरएचे वरिष्ठ अधिकारी डॉ. जे. के. सोळंकी.यांनी दिली.
गेल्या १८ वर्षांपासून खोडद येथील जीएमआरटी प्रकल्पात राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या दिवशी साजरा होणारे विज्ञान प्रदर्शन हे ग्रामीण भारतातील सर्वात मोठे विज्ञान प्रदर्शन असून ते देशभर प्रसिद्ध आहे. दरवर्षी शाळा, महाविद्यालये आणि वेगवेगळ्या संस्था यामध्ये भाग घेतात आणि दरवर्षी, दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये २५ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी या विज्ञान प्रदर्शनाला भेट देतात.
कोरोनाचा वैश्विक संकटाच्या परिस्थितीमध्ये येणारा राष्ट्रीय विज्ञान दिवस २८ फेब्रुवारी २०२१ ऑनलाइन पद्धतीने साजरा होणार असून विज्ञान प्रयोगांचे ऑनलाईन प्रदर्शन Growing Dots या मोबाईल अॅपच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचा नॉलेज मॅप विकसित करण्यामध्ये अग्रेसर असणारी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज (आय.आय.के) ही संस्था शाळांच्या रिअल टाईम डिजिटल अडमिनिस्ट्रेशन (संगणकीय व्यवस्थापन) साठीही काम करते.
इयत्ता ५ वी पासून उच्च पदवीधरपर्यंतच्या सर्व माध्यमिक शाळा, महाविद्यालये (डिप्लोमा, आय.टी.आय., बी.एस.सी.इंजिनिअरिंग, एम.एस.एस.सी.चे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.सहभागी होण्यासाठी कसलीही रजिस्ट्रेशन फी नाही. सहभागी होण्यासाठी प्रोजेक्ट विडिओ अपलोड करायचा आहे. विज्ञान प्रयोग व प्रकल्प अपलोड करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी आहे. आपला अनुभव, शिक्षक, विद्यार्थी, मार्गदर्शक, तज्ज्ञ यांच्यासोबत द्विगुणित करण्यासाठी आणि विज्ञान दिवसाचा आणि जीएमआरटीचा भाग बनण्यासाठी आपल्या शाळेचे , महाविद्यालयाचे रजिस्ट्रेशन करा. सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सहभाग प्रमाणपत्र मिळेल. सर्वोत्तम प्रयोगांना वयोगटाप्रमाणे विविध बक्षिसे मिळतील. आपली नावनोंदणी करण्यासाठी https://bit.ly/3e2QQyB या लिंकवर जाऊन जीएमआरटी सायन्स डे ग्रोविंग डॉट हे ऍप डाउनलोड करा आणि अधिक माहितीसाठी ९०२२७६९१९९/९४२२५०५४७८/ ०२१३२-२५८३०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जीएमआरटीच्या वतीने करण्यात आले आहे.
आपल्या शाळेतील, महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबाबत आवड निर्माण व्हावी आणि त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा तसेच जीएमआरटीसारख्या नावाजलेल्या व्यासपीठावर स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी शाळा व महाविद्यालयांनी या ऑनलाईन विज्ञान प्रदर्शनात सहभाग घ्यावा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी ऑनलाईन विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ऑनलाईन देखील भरघाेस प्रतिसाद मिळेल असा विश्वास आहे." -
अभिजित जोंधळे, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, जीएमआरटी प्रकल्प, खोडद, ता. जुन्नर
सोबत जीएमआरटी डिश अँटेना