यवत : यवत ग्रामपंचायतीमध्ये निधीचा अपहार व अनियमितता केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या तत्कालीन सरपंच शामराव शेंडगे यांना पोलिसांनी दौंड तहसील कार्यालयाच्या आवारातून ताब्यात घेतले. दौंड पंचायत समितीच्या यवत गणातून शेंडगे त्यांच्या पत्नीचा अर्ज दाखल करण्यासाठी दौंड तहसील कार्यालयात आले होते. त्यांच्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल असताना मागील काही दिवसांपासून अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी प्रयत्नशील होते, मात्र अटकपूर्व जामीन मिळाला नसताना आज ते तहसील कार्यालयात निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याकामी आल्याचे दिसून येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत यवत पोलीस ठाण्यामध्ये पुढील कारवाई सुरू होती.यवत ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच शामराव शेंडगे व ग्रामविकास अधिकारी डी. बी. केकाण यांनी सन २०११-१२ या आर्थिक वर्षात सुमारे ८ लाख रुपयांचा ग्रामपंचायत निधीचा अपहार केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दौंड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (पंचायत) यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिलेली होती. निधीचा अपहार केल्याची तक्रार दौंड तालुका भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष उत्तम गायकवाड व शब्बीर सय्यद यांनी विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे केली होती. (वार्ताहर)
यवतचे तत्कालीन सरपंच पोलिसांच्या ताब्यात!
By admin | Updated: February 7, 2017 02:54 IST