तज्ज्ञांअभावी चुकीचे धोरणात्मक निर्णय : भालचंद्र मुणगेकर; टिमवित आंतरराष्ट्रीय परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 12:41 PM2018-01-06T12:41:02+5:302018-01-06T12:44:40+5:30
मोदी सरकारने नियोजन आयोगच बरखास्त केला. त्यामुळे धोरणात्मक निर्णय घेताना तज्ज्ञांची मदत मिळत नाही. परिणामी हे निर्णय चुकत असून राष्ट्रीय उत्पन्नात घट होत असल्याचे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले.
पुणे : नियोजन आयोग स्थापन करण्यासाठी जवाहरलाल नेहरू यांनी २९ वर्ष लढा दिला. पण मोदी सरकारने हा आयोगच बरखास्त केला. त्यामुळे धोरणात्मक निर्णय घेताना तज्ज्ञांची मदत मिळत नाही. परिणामी हे निर्णय चुकत असून राष्ट्रीय उत्पन्नात घट होत असल्याचे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या ‘आधुनिक तंत्रज्ञान आणि रोजगार क्षमता : भविष्यकालीन दृष्टीकोन’ या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दीपक टिळक, उपकुलगुरु डॉ. गीताली टिळक-मोने, विद्यापीठाच्या प्रशासकीय सल्लागार डॉ. प्रणती टिळक, कुलसचिव अभिजीत जोशी, संचालक अजित खाडीलकर उपस्थित होते.
मुणगेकर म्हणाले, जागतिक मंदी असताना नियोजन आयोगाने सूचविलेल्या आर्थिक बाबींमुळे राष्ट्रीय उत्पन्न ८ टक्क्यांच्या जवळ होते. त्यामुळे भारताला मंदीची फारशी झळ पोहोचली नाही. सध्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. रोजगार उपलब्ध करून देताना त्याची विश्वासार्हता, स्थिरता, मिळणारे फायदे या सर्वांचा विचार करणे आवश्यक आहे. बांधकाम, आधुनिक तंत्रज्ञान यामध्ये रोजगार वाढत आहेत. मात्र या रोजगाराची गुणवत्ता तपासणे हेही तितकेच गरजेचे आहे.
आधुनिक तंत्रज्ञान वाढत असताना अनेक जुने रोजगार बंद होत आहेत. सरकारने ३० टक्के सरकारी नोकऱ्या कमी करण्याचे धोरण आखले आहे. तेव्हा या तरुणांनी करायचे काय असा प्रश्न निर्माण झाल्याचे डॉ. दीपक टिळक यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिजित जोशी यांनी केले. डॉ. प्राजक्ती बाकरे यांनी सूत्रसंचालन केले.