पुणे : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देत तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी न्यायालयाने एकास ७ वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अनिल रमेश कदम (वय ४८, खंडेवस्ती, भोसरी एमआयडीसी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. पद्माकुल बहाद्दूर ठाकूर (वय ४२, रा. खंडेवस्ती, एमआयडीसी, भोसरी) यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. त्यांनी मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबानुसार, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील कमलाकर नवले यांनी काम पाहिले. पद्माकुल या मूळच्या नेपाळच्या असून, पतीच्या निधनानंतर त्यांच्यावर दोन मुली व एका मुलाची जबाबदारी होती. दोन मुलींची लग्ने झाली असून मुलगा नेपाळमध्ये राहतो.तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एस. एच. भागवत यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. मुलीने अन्य जातीतील मुलाशी विवाह केल्याने त्या मानसिक तणावाखाली होत्या. त्या तणावातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा बचाव अनिलने केला होता. अतिरिक्त सरकारी वकील कमलाकर नवले यांनी ८ साक्षीदार तपासले व जन्मठेप देण्याची मागणी केली. या प्रकरणात मृत्युपूर्व जबाब व प्रत्यक्षदर्शींची साक्ष महत्त्वाची ठरली. मात्र, न्यायालयात आरोपीचा खुनाचा हेतू साध्य झाला नाही. त्यामुळे अतिरिक्त सत्र न्यायाधीश महंमद नासीर सलीम यांनी अनिलला सदोष मनुष्यवधप्रकरणी दोषी धरत सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. (प्रतिनिधी)
महिलेला पेटविणाऱ्यास शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2015 03:28 IST