पुणे - जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी जमलेल्या सर्वपक्षीय महिलांनी त्यातच येरवड्यातील रस्त्यावर भर सकाळी अश्लिल क्रुत्य करणार्या गौरव आहुजा याचा निषेधही केला. असल्या विक्रुत गुन्हेगारांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. महिला दिन साजरा करण्यासाठी या सर्व महिला डेक्कनच्या कलाकार कट्ट्यावर सांयकाळी ४ वाजता जमल्या. त्यात शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे, काँग्रेसच्या माजी आमदार दीप्ती चवधरी, संगिता तिवारी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या अँड. रूपाली पाटील- ठोंबरे, भाजपच्या माजी नगरसेविका श्रीमती लडकत, मनिषा कावेडिया माजी महापौर कमल व्यवहारे व अन्य अनेक महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या होत्या. शनिवारी सकाळीच येरवडा येथे गौरव आहुजा याने भर रस्त्यात सिग्नलला आपली गाडी थांबवून, गाडीचे दार उघडून अश्लील क्रुत्य केले. त्याचा व्हिडीओ रस्त्यावरच्याच एकाने केला. तो समाजमाध्यमांवर लगेचच व्हायरल झाला. स्वारगेट बलात्कार व त्यापाठोपाठ हे प्रकरण यामुळे सर्वच महिला संतापल्या होत्या. त्यामुळे महिला दिन थोडा वेळ बाजूला ठेवत त्यांनी आहुजाचा निषेध केला. पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घ्यावे, त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली. पोलिसांचा वचक कमी झाला, कायद्याचा धाक राहिला नाही, त्यामुळेच असे प्रकार वाढत आहेत अशी टीका करण्यात आली.
सर्वपक्षीय महिलांनी जागतिक महिला दिनी अश्लिल क्रुत्य करणाऱ्या आहुजाचा केला निषेध
By राजू इनामदार | Updated: March 8, 2025 18:17 IST