पुणे : आपल्या सिद्धहस्त लेखणीतून ‘गीतरामायण’ अजरामर करणारे गजानन दिगंबर माडगूळकर यांच्या पुण्यातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्मारकाच्या निषेधार्थ गदिमांच्या पुण्यतिथीदिनी (१४ डिसेंबर) ‘गदिमा’प्रेमींनी आंदोलनाची घोषणा केली. मात्र महापौरांनी तत्पुर्वीच स्मारकाच्या भूमीपूजनाचा मुहूर्त जाहीर केल्याने गदिमा स्मारक जनआंदोलनातून माडगूळकर कुटुंबीय बाजूला झाले आहेत.
आंदोलकांनी पुण्यतिथीदिनी गदिमांच्या काव्याचे वाचन करण्याचे ठरवले आहे. “गदिमांच्या साहित्याचा जागर करायला आमचा विरोध नाही. मात्र जागराच्या आडून छुपे आंदोलन करण्यास आमचा विरोध असेल,” अशी भूमिका यावर माडगूळकर कुटुंबीयांनी घेतली आहे.
अनेक वर्षांपासून रखडलेले गदिमांचे स्मारक त्यांच्या जन्मशताब्दी वर्षातच उभे राहील अशी घोषणा करण्यात आली. मात्र गदिमांची एकशेएकावी जयंती आली तरी काही हालचाली झाल्या नाहीत याच्या निषेधार्थ राज्यभरातील गदिमाप्रेमींनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. तत्पुर्वीच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महिन्याच्या आत स्मारकाचे भूमिपूजन करण्याचा शब्द माडगुळकर कुटुंबियांना दिला.
“यामुळे महापौरांच्या शब्दाचा आदर करून नियोजित आंदोलन न करता साहित्य जागर करण्याचे आंदोलनातील कार्यकर्ते प्रदीप निफाडकर यांना सुचवले. मात्र त्यांचा एकूण कल हा आंदोलन पुढे चालू ठेवण्याचाच दिसला. त्यामुळे यात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला,” असे गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी जाहीर निवेदनात म्हटले आहे. गदिमांचा वापर कोणीही स्वाथार्साठी करू नये अशी. १४ डिसेंबरच्या आंदोलनात कोणीही माडगूळकर कुटुंबीय उपस्थित असणार नाही. आमच्या निर्णयामुळे गदिमा प्रेमींना काही त्रास झाला असेल तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, असे त्यांनी म्हटले आहे.
चौकट
“गदिमांच्या पुण्यतिथीदिनी (१४ डिसेंबर) गदिमांच्या कवितांचे अभिवाचन केले जाईल. माडगूळकर कुटुंबीयांना महापौरांनी आश्वासन दिले आहे ही खूप चांगली गोष्ट आहे. आमचे काहीच म्हणणे नाही. महापौरांच्या शब्दावर त्यांचा विश्वास असेल तर ते व्हायला पाहिजे. त्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत.”
- प्रदीप निफाडकर, गदिमा स्मारक आंदोलन कार्यकर्ते