पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखती अजित पवार यांनी रविवारी गोखलेनगर येथील बारामती होस्टेलमध्ये घेतल्या. यावेळी राज्यातील नगर परिषदांच्या निवडणूक निकालाबाबत अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि तुम्ही एकत्र येणार का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, आम्ही यापूर्वी जेव्हा महाविकास आघाडीत होतो, तेव्हा स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देत असे. तशाच प्रकारे याबाबतही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य, त्या - त्या जिल्हाध्यक्षांना व शहराध्यक्षांना दिले आहेत. मतांची विभागणी होऊ दिली नाही तर निवडून येणे सोपे जाते, त्यामुळे ते-ते अध्यक्ष निर्णय घेतील.
महायुतीच्या सरकारने गेल्या वर्षभरात केलेल्या कामाचे फळ नगरपरिषद व नगर पंचायतीच्या निकालाद्वारे मिळाले आहे. आम्हाला एकमेकांच्या विरोधात उभे राहावे लागले. मात्र, आम्ही तारतम्य ठेवून प्रचार केला. जनतेने आम्हाला चांगला कौल दिला. त्यामुळे आमची जबाबदारी वाढलेली आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
जनतेने महाविकास आघाडीला चांगला कौल दिला आहे, त्यामुळे आमची जबाबदारी वाढली असून, निवडून आलेले जबाबदारीचे भान ठेवून काम करतील. पुणे व पिंपरी - चिंचवड महापालिका आम्ही व भाजप वेगवेगळे लढणार आहोत, हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. आम्ही मित्र पक्ष म्हणून एकमेकांचे उमेदवार घ्यायचे नाहीत किंवा माजी पदाधिकारी घ्यायचे नाहीत, असे ठरले होते. परंतु, ते घेतले गेले आहेत. मुंबईत गेल्यावर चर्चा करू. बाहेरचे घेतल्याने निष्ठावंतांवर अन्याय होतो. एकाने सुरुवात केली तर समोरचाही सुरुवात करतो, असे म्हणत अजित पवारांनी मनातली खदखद व्यक्त केली.
अजित पवार म्हणाले,
- मी आघाडीबाबत दिल्लीतील वरिष्ठ किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलेन.- रायगड व नाशिक पालकमंत्रिपदाचा निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. ते तिढा सोडवण्यासाठी सक्षम आहेत.- महायुतीमध्ये आपण कमी जागा लढवल्या होत्या, त्यामुळे मिळालेल्या यशाबद्दल आपण खूश आहोत.- नगर परिषदांच्या निकालाचा थोडाफार परिणाम महापालिका निवडणुकीवर होईल.- धनंजय मुंडे दोन कामांसाठी अमित शाहांना भेटले, मंत्रिमंडळातील त्यांच्या समावेशाचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे.