पुणेकरांना पडला प्रश्न, महत्त्वाच्या गाड्या अद्यापही बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बंद करण्यात आलेल्या रेल्वेगाड्या आता सुरू होत आहेत. मात्र अजूनही पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. यात तर काही गाड्या पहिल्या लॉकडाऊननंतर जे बंद पडल्या, त्या अद्यापही सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे गाड्या सुरू होणार तर केव्हा असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.
पुणे-मुंबई अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशाकरिता डेक्कन क्वीन व डेक्कन एक्स्प्रेस सुरू होत आहे. मात्र सिंहगड, प्रगती, इंद्रायणी, इंटरसिटी गाड्या अद्यापही बंदच आहेत. शिवाय पुण्याहून दक्षिण भारतात जाणाऱ्या तसेच विदर्भात जाणाऱ्या प्रमुख गाड्या बंद आहे. सोलापूर, कोल्हापूर, सातारा आदी भागांतून देखील मोठ्या प्रमाणात प्रवासी रोज पुण्यात दाखल होत असतात. अशा शहरांना जोडणाऱ्या गाड्या देखील बंदच आहेत. त्यामुळे तिथल्या प्रवाशांची देखील गैरसोय होत आहे.
बॉक्स 1
या रेल्वे सुरू आहेत :
डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस, उद्यान एक्स्प्रेस, कोणार्क एक्स्प्रेस, पुणे-दानापूर, पुणे-बिलासपूर, आझाद हिंद एक्स्प्रेस, गोवा एक्स्प्रेस, पुणे - दरभंगा, झेलम एक्स्प्रेस, पुणे - हावडा एक्स्प्रेस, पुणे - गोरखपूर एक्स्प्रेस, पुणे - वेरावल एक्स्प्रेस, आदी गाड्या पुणे स्थानकावरून धावत आहे.
बॉक्स 2
या गाडया कधी सुरू होणार :
प्रगती, सह्याद्री, कोयना, इंद्रायणी, हुतात्मा, विशाखापट्टनम, पुणे - सिकंदराबाद शताब्दी, इंटरसिटी, सिंहगड, महालक्ष्मी, पुणे - नागपूर, पुणे - अजनी एक्स्प्रेस, पुणे - अहमदाबाद दुरांतो, पुणे - भुवनेश्वर, पुणे - हैदराबाद व्हाया लातूर आदी गाड्या सुरू होण्याची प्रवासी वाट पाहत आहे.
बॉक्स 3
पॅसेंजर गाड्याचे घोडे कुठे अडले :
पॅसेंजर गाड्यातून रेल्वेला फारसे उत्पन मिळत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात रेल्वे प्रशासन पॅसेंजर गाड्याची सेवा बंद करणार आहे. तसेच येणाऱ्या नवीन झिरो बेस टाईम टेबल मध्ये अनेक गाडया रद्द तर अनेक गाड्यांचे थांबे रद्द होणार आहे. हे टाइमटेबल डिसेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी पॅसेंजर गाड्याचे भवितव्य काय असेल हे स्पष्ट होईल.
कोट : 1
पुणे व मुंबई येथील निर्बंध आता शिथिल झाले आहेत.त्यामुळे बंद केलेल्या रेल्वे आता सुरू झाल्या पाहिजेत. यामुळे प्रवाशांची सोय होईल.
- निखिल काची, विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य, पुणे
कोट 2
अनेक महत्त्वाच्या गाडया रेल्वे प्रशासनाने सुरू केल्या नाहीत. त्या तत्काळ सुरू केल्या पाहिजेत. शिवाय लोकल व मेमूमधून आता सामान्य प्रवाशांना देखील प्रवास करण्यास मंजुरी मिळावी.
-हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप, पुणे