पुणे तिथे काय उणे! साडी नेसून, गॉगल घालून पुणेकर महिलांचा मॉर्निंग वॉक

By श्रीकिशन काळे | Published: February 17, 2024 03:51 PM2024-02-17T15:51:44+5:302024-02-17T15:53:41+5:30

सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे मैत्री उद्यानात हा उपक्रम योग व प्राणायाम शिक्षिका भाग्यश्री चौथाई यांनी आयोजिला होता...

What's wrong with Pune Morning walk of Punekar women wearing sarees and goggles | पुणे तिथे काय उणे! साडी नेसून, गॉगल घालून पुणेकर महिलांचा मॉर्निंग वॉक

पुणे तिथे काय उणे! साडी नेसून, गॉगल घालून पुणेकर महिलांचा मॉर्निंग वॉक

पुणे : छान छान साड्या नेसून, डोईवर टोपी, डोळ्यांवर गॉगल घेऊन ऐटीत एक एक महिला पहाटे साडेसहा वाजल्यापासून जमू लागल्या. त्या कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमाला किंवा लग्नाला निघाल्या नव्हत्या, तर चक्क मॉर्निंग वॉकला आल्या होत्या. साडीमध्ये देखील मॉर्निंग वॉक होऊ शकतो, हे दाखवून गप्पा-टप्पा अन् योग, प्राणायाम करण्यासाठीचा कार्यक्रम पु. ल. देशपांडे उद्यानामध्ये शनिवारी सकाळी झाला. पुणेकर महिला हटकेच काही तरी करतात, त्याचेच हे एक उदाहरण.

सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे मैत्री उद्यानात हा उपक्रम योग व प्राणायाम शिक्षिका भाग्यश्री चौथाई यांनी आयोजिला होता. महिलांना एक वेगळा अनुभव मिळावा यासाठी त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याला ३५ हून अधिक महिलांनी प्रतिसाद दिला. अनेकजणी पहिल्यांदाच हा मॉर्निंग वॉकचा अनुभव घेत होत्या. तर देशपांडे उद्यानातही पहिल्यांदाच आल्या होत्या. त्यांनी उद्यानात एक एक राऊंड मारायला सुरवात केली आणि सर्वांच्या उत्साहाला उधाण आले. सोबतच फोटोसेशन देखील करण्यात आले.

महिलांनी पहाटे पहाटे उठून चक्क साडी नेसली आणि स्पोर्ट शूज घालून व्यायामासाठी त्या घराबाहेर पडल्या. बागेमध्ये सर्वजण जमल्या. एकेक मैत्रिण छान छान साडी नेसून हसत हसत प्रसन्न वदनानं समोर येऊ लागल्या आणि सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला. सर्वांचा शारीरिक व्यायाम झाला, मनाचाही व्यायाम झाला. सर्वांनी राऊंड मारल्यानंतर शेवटी पाच मिनिटे शांतता वर्ग झाला. प्रार्थना, ओंकार म्हणून, दीर्घ श्वसन झाले. त्यामुळे सर्वांना एक वेगळीच ऊर्जा, समाधान मिळाले. यात वैशाली पाटील, अलका किनीकर, सुरेखा भोपळे आदींनी सहभाग घेतला.

आज पहाटे आम्हा सगळ्यांना वेगळीच ऊर्जा मिळाली. महिलांना वेगळा अनुभव मिळावा, म्हणून हा कार्यक्रम घेतला. यासाठी अनेक महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला.

- भाग्यश्री चौथाई, प्राणायाम आणि मेडिटेशन शिक्षिका

आजचा साडी नेसून येणे तेही एवढ्या सकाळी हा खरे तर खूप मोठा टास्क होता. मला तर येणे अशक्यच वाटत होते. पण मुलगी आणि तिच्या बाबांच्या मदतीमुळे मी येऊ शकले. खूपच छान वाटले. मैत्रीणीना खूप दिवसांनी भेटून रिफ्रेश झाल्यासारखे वाटले.
- गायत्री कुलकर्णी

Web Title: What's wrong with Pune Morning walk of Punekar women wearing sarees and goggles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.